पेमगिरी महावटवृक्षाच्या सानिध्यात महिला सन्मानासह पर्यावरणाचा संदेश

नीलम खताळ यांची उपस्थिती ; फळझाडांच्या दोन हजार रोपांचे वाटप

संगमनेर : प्रतिनिधी –

तालुक्यातील ऐतिहासिक पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘उत्सव माझ्या कुंकवाचा’ हा महिला सन्मान सोहळा भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम ठरला. हजारो महिलांनी महावटवृक्षाला सात फेरे मारून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. या उत्सवात आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या.

ऐतिहासिक व स्वराज्य संकल्पभूमी म्हणून ओळख असलेल्या पेमगिरी येथे जाकमत बाबा मित्र मंडळ, आदिशक्ती फाउंडेशन (संगमनेर) आणि शिवसेना महायुती (संगमनेर) यांच्या संयुक्त विद्यमाने हा आगळावेगळा सोहळा पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मंगल खताळ, नीलम खताळ, वृषाली गुंजाळ, जादूगार रिया कानवडे, महिला तालुकाध्यक्ष सुनीता कानवडे, कविता पाटील, आरती सातपुते आणि शीतल खताळ यांच्या हस्ते महिला सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वटपूजेसाठी आलेल्या प्रत्येक महिलेला पेरू, आवळा, आंबा आदी विविध फळझाडांची रोपे भेट देण्यात आली. सुमारे दोन हजार फळझाडांच्या रोपांचे वाटप करून “पूजेसोबत वृक्षसंवर्धन” हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

निमगाव पागा येथील जादूगार रिया कानवडे यांच्या जादूच्या प्रयोगांनी महिलांची मने जिंकली, तर माधुरी गुंजाळ आणि मच्छिंद्र बिडवे यांच्या गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. मच्छिंद्र बिडवे यांनी आमदार अमोल खताळ यांच्यावर आधारित गीत सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी गुंजाळ यांनी केले, तर आभार अर्चना वनपत्रे यांनी मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!