गोवंश कत्तलखान्यावर एलसीबीचा छापा !
३ आरोपी जेरबंद २३० किलो गोमांसासह ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त मुख्य सूत्रधार फरार
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर शहरातील फकीर गल्ली परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल २३० किलो गोमांस, खिमा तयार करण्याचे मशीन, वजनकाटा आणि धारदार शस्त्रे असा ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे मिसगर लायब्ररीसमोरील फकीर गल्लीतील पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला. तेथे काही जण गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान मुनावर फकीर सय्यद (वय ४०), नविद रफिक कुरेशी (वय ३०) आणि सलीम फय्याज अहमद कुरेशी (वय ३३) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी ही कत्तल आयुनल फय्याज अहमद कुरेशी याच्या सांगण्यावरून सुरू असल्याची माहिती दिली. संबंधित आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलीसांनी घटनास्थळावरून २३० किलो गोमांस, खिमा तयार करण्याचे स्टील मशीन, सुरे, सत्तूर, टोचा आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण ७६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

