अवैध वाळू वाहतुक करणारे तस्कर पकडले !
२० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
मुख्य आरोपी ताब्यात, हायवासह चार ब्रास वाळू जप्त
पारनेर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील पळशी (ता. पारनेर) येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत २० लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत हायवा चालकास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाईसाठी गस्त घालत होते.

दरम्यान, २८ जून रोजी गुप्त बातमीदारामार्फत नागापूरवाडी येथून पळशीकडे वाळू भरलेला टाटा कंपनीचा हायवा येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पळशी-नागापूरवाडी मार्गावर सापळा रचून हायवा अडवला.
चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव वसीम पाशु शेख (वय २६, रा. वळदगाव, ता. श्रीरामपूर) असे सांगितले. तपासणीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून सुमारे ४० हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू तसेच २० लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा हायवा असा एकूण २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारनेर पोलीस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि. अनंत सालगुडे, दीपक मेढे तसेच पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश लबडे, अतुल लोटके, विजय पवार, शाहिद शेख, पंकज व्यवहारे, बाळासाहेब गुंजाळ व योगेश कर्डीले यांच्या पथकाने केली.
