अवैध गर्भलिंग निदान चाचण्या व अवैध गर्भपात प्रकरणात आणखी एका डॉक्टरला अटक !

 गुन्ह्यात अद्याप पर्यंत २४ आरोपींना अटक 

८ डॉक्टर, ३ मेडिकल स्टोअर चालक देखील तुरुंगात 

अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची माहिती 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचण्या करणे व बेकायदेशीरपणे गर्भपात करणे या संबंधाने दाखल गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांकडून अतिशय बारकाईने या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये गुरुवारी अवैध गर्भलिंग निदान चाचण्या व अवैध गर्भपात प्रकारात सामील असणाऱ्या आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली. 

अटक केलेल्या डॉक्टरचे नाव ज्ञानेश्वर नायकोडी (वय 54, बीएएमएस, राहणार शिरूर,जिल्हा पुणे) असे असून आता या प्रकरणात एकूण 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अनेक डॉक्टर,मेडिकल चालक, एजंट यांचा या गैरप्रकारांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न होत आहे. गुन्ह्याची व्याप्ती देखील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वाढत जात आहे. अटक केलेले डॉक्टर,एजंट, मेडिकल चालक यांच्याकडे तपास करता, त्याचप्रमाणे त्यांच्याकडून मिळून आलेल्या विविध बाबींचा तांत्रिक तपास करता वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये यांचे एजंटचे जाळे सक्रिय असल्याचे निष्पन्न होत आहे. 

सदरील डॉक्टर हा या रॅकेटमध्ये सामील असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असून आज रोजी त्यांना राहता न्यायालयात सादर केले असता त्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे.

या डॉक्टरकडे महिला गर्भवती पेशंट यांना नेमके कोण पाठवत होते? त्यात नेमके कोण एजंट सामील आहे? आतापर्यंत किती महिलांच्या गर्भलिंग निदान चाचण्या वा गर्भपात यांनी घडवून आणले या सर्व बाबींचा तपास या दरम्यान करण्यात येणार आहे.

आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे . विशेष म्हणजे त्यापैकी 8 डॉक्टर आहेत. तर 3 जण मेडिकल चालक आहे व एक जण मेडिकल साहित्याचा पुरवठा करणारा मोठा पुरवठादार आहे.

याशिवाय गुन्ह्यामध्ये आतापर्यंत झालेल्या तपासात अवैध गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणारे एकूण 6 सोनोग्राफी मशीन वेगवेगळ्या ठिकाणावरून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. तसेच 4, चार चाकी गाड्या व एक दुचाकी देखील जप्त करण्यात आले आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अमोल भारती व सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे हे करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!