अकोलेत चोरट्यांचा धुमाकूळ !…
घरात घुसून अंगावरील दागिने आणि रोख रक्कम पळवली —
जबरी चोरीसह घरफोडीचा गुन्हा दाखल
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरात घुसून अंगावरील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम पळविण्यात आले. घरफोडी करण्याची देखील घटना घडली आहे. जबरी चोरी आणि घरफोडीच्या या घटनेमुळे पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकोले तालुक्यातील औरंगपूर या ठिकाणी फिर्यादीच्या राहत्या घरात जबरी चोरीची घटना घडली असून चार अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोने जबरदस्तीने ओढून घेतले आणि घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम पळवून नेली. या सर्व जबरी चोरीमध्ये सुमारे 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला आहे. अशोक केरू वाळुंज (राहणार औरंगपूर तालुका अकोले) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

दुसरी घटना घरफोडीची असून धुमाळवाडी येथे घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिन्याने रोख रक्कम चोरून देण्यात आली आहे. धुमाळवाडी येथे फिर्यादीच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी किचनचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश करून किचनमध्ये तसेच कपाटात ठेवलेली रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले असल्याची फिर्याद रामनाथ गणपत निमसे (अंबिका नगर, निमसे वस्ती, धुमाळवाडी तालुका अकोले) यांनी दिली आहे. या घरफोडीमध्ये एकूण 2 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.
अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी अधिक कर्तव्यदक्षपणे काम करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
