काहींनी राजकीय स्वार्थ किंवा ईडीच्या भीतीपोटी पक्ष बदलले — माजी मंत्री बाळासाहेब थोरात
निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून पाणी देणे हे जीवनाचे उद्दिष्ट
तरुणांच्या प्रश्नाला दिलखुलास उत्तरे
संगमनेर प्रतिनिधी —
आपल्या कुटुंबाला वारकरी व पुरोगामी विचारांची बैठक आहे. राजकारण हे गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी असते. सत्तेसाठी नाही. मात्र काही जण विकासाचे नाव सांगून स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीपोटी पक्ष बदलून गेले आहेत. इतिहास सर्व गोष्टींची नोंद घेतो. आपली लढाई ही विचारांसाठी आणि तत्त्वांसाठी आहे. येणाऱ्या काळात सर्व बदलणार आहे. लवकरच ती ताकदीची वेळ येईल असे सांगताना इतिहास नेहमी लढणाऱ्यांची नोंद घेतो असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या वतीने आयोजित युवा संगम या कार्यक्रमात युवक काँग्रेसच्या युवकांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
सतत काम करून दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे, संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना, तालुक्या शेजारी विमानतळ, नियोजित नाशिक पुणे रेल्वे, यांसह राज्यातील सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था, शिक्षण संस्था आणि शांतता सुव्यवस्था असलेला सज्जन व विकसित तालुका ही संगमनेर तालुक्याची ओळख निर्माण केली आहे. निळवंडे धरण व दोन्ही कालवे पूर्ण करून दुष्काळी भागातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देणे हे जीवनाचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. तरुणांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना दिली असून युवकांच्या सर्व प्रश्नांना त्यांनी अत्यंत दिलखुलास उत्तरे दिली.

यावेळी आपल्या महाविद्यालयीन कार्यकाळाबाबत थोरात म्हणाले की, विद्यार्थी दशेमध्ये विविध आंदोलनांमध्ये सहभागी घेतला याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार राहिला. पुण्यात लॉ कॉलेजचे जनरल सेक्रेटरी पद भूषविले. यामधून मोठा मित्रपरिवार निर्माण झाला.
आंदोलन हा स्थायीभाव असल्याने मीटर हटाव, टेंभेंआंदोलन, मराठवाडा नामांतर आंदोलन, निळवंडे पाणी प्रश्न आंदोलन अशा विविध आंदोलनांमध्ये सहभाग राहिला या मधून 9 दिवसांचा कारावास सुद्धा झाला.

निळवंडे धरण पूर्ण करणे हे जीवनाचे ध्येय होते. 1992 ला निळवंडे धरणाचे काम सुरू झाले. मात्र 95 ते 99 या काळात हे काम थांबले होते. 1999 नंतर कॅबिनेट मंत्रीपद मिळत असताना सुद्धा निळवंडे कामासाठी राज्यमंत्रीपद (पाटबंधारे) मागून घेतले. अनंत अडचणीवर मात करून निळवंडे धरण पूर्ण केले. 2012 मध्ये भिंत पूर्ण झाली. डावा व उजवा कालव्यांची कामे पूर्ण केली. सर्व शेतकऱ्यांना पाणी देणे हे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. काम पूर्ण आपण केले. मात्र पाणी वाटपासाठी आपण नाही.
याचबरोबर संगमनेर शहरासाठी आलेली पिण्याच्या पाण्याची थेट पाईपलाईन योजना, तालुक्याजवळ झालेले काकडी विमानतळ, शांतता, सुव्यवस्था, बंधुभाव असलेला संगमनेर तालुका, उत्कृष्ट सहकारी व शिक्षण संस्था, समृद्ध ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सुकून असलेली संगमनेर शहर ही ओळख आपण निर्माण केली.1986 मध्ये पठार भागातील कोटमारा धरणासाठी थेट पंतप्रधान राजीव गांधी यांना पत्र लिहून या धरणासाठी वन विभागाची जमीन आपण मिळवली.
नाशिक पुणे सरळ रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. यामधून रेल्वे करता 560 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यावेळेस जीएमआरटीची कोणतीही अडचण नव्हती. आता मात्र संगमनेर तालुक्याची प्रगती रोखण्याकरता या अडचणी निर्माण केल्या जात आहेत. पण काही झाले तरी रेल्वे नियोजित मार्गानेच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजकारणामध्ये जातीयता आणि रंगद्वेष वाढला असून आपण वारकरी संप्रदाय व राज्यघटना मानणाऱ्या विचाराचे आहोत. राजकारण हे जनतेच्या विकासासाठी करायचे असते. असे सांगताना सत्ताधाऱ्यांनी राजधर्माचे पालन केले पाहिजे. मात्र सध्या ते होत नसल्याची टीका त्यांनी केली.
याचबरोबर महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर शरद पवार पर्व असल्याचे सांगताना वडीलधाऱ्यांचा मान ठेवून राजकारण झाले पाहिजे. मात्र प्रसिद्धीसाठी कशीही टीका केली जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे. राजकारणामध्ये कधीही व्यक्तीदोष नसावा. तालुक्याच्या विकासाची वाटचाल कायम ठेवण्याकरता ज्येष्ठ व तरुणांनी एकत्र येऊन आपली परंपरा जपावी असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आयोजक डॉ. जयश्री थोरात यांनी केले. यावेळी संगमनेर तालुक्यातील युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
