तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात ; कोल्हेवाडी फाटा येथील अडथळा दूर

संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील निंबाळे शिवारात प्रवरा नदीवरून कोल्हेवाडी फाटा मार्गे वडगावपान साठवण तलावात पाणी सोडण्यासाठी सुरू असलेल्या पाईपलाईन जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही काळ कोल्हेवाडी फाटा येथे अडथळ्यांमुळे काम मंदावले होते. मात्र हा अडथळा दूर करण्यात आल्याने सध्या काम युद्धपातळीवर सुरू असून पुढील १० ते १५ दिवसांत तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १६ गावांना शुद्ध पाणीपुरवठा सुरू होणार आहे अशी माहिती आमदार अमोल खताळ यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.

तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत कोल्हेवाडी फाटा येथे अडथळे निर्माण झाले होते. हे अडथळे दूर झाल्यानंतर प्रवरा नदीतील पाणी पाईपलाईनद्वारे वडगावपान साठवण तलावात सोडण्याचे काम सुरू आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे हे पाणी शुद्ध करून तळेगावसह १६ गावांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून पुरवठा केला जाणार आहे.

या योजनेतील जलशुद्धीकरण प्रकल्पासह बहुतांश काम पूर्ण झाले असून उर्वरित पाईपलाईन जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम येत्या १० ते १५ दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या योजनेच्या व्यवस्थापन आणि अंमलबजावणीबाबत काही आरोप होत आहेत. पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष व काही सदस्य हे काँग्रेस पक्षाचे असून, वीज बिल थकीत राहिल्याने काही वेळा वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनाही घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही गावांना नियमित पाणीपुरवठ्यात अडचणी आल्याची स्थानिकांची तक्रार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत कामे सध्या वेगाने सुरू असली तरी त्याचे कंत्राटही काँग्रेसशी संबंधित ठेकेदाराकडे असल्याचा आरोपही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

“तळेगाव दिघे गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था उभी करण्यात आली आहे. राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून भागवतवाडी येथील तलावातून पाईपलाईनद्वारे पाणी उचलून ग्रामपंचायतीमार्फत तळेगावला पुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र या कामाचे काहीजण खोटे श्रेय घेत आहेत.”

— मयूर दिघे (उपसरपंच, तळेगाव दिघे)

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!