संगमनेर खुर्द कचरा डेपो समस्येवर स्वतंत्र बैठक घेणार – पालकमंत्री विखे पाटील
संगमनेर खुर्द मधली दादागिरी सहन केली जाणार नाही — आमदार खाताळ
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर खुर्द येथील कचरा डेपो बाबतची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान किंवा अधिवेशनानंतर स्वतंत्र बैठक घेऊन कचरा डेपोबाबत कायम स्वरूपी तोडगा काढला जाईल असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर खुर्द वासियांना दिले आहे.

संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द प्रवरा नदी पुलापर्यंत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून झालेल्या महामार्ग चौपदरीकरणा वरील स्ट्रीट लाईटचे काम पूर्ण झाले आहे. त्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुदामराव सानप, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, उपसरपंच गुलाब शेख, बाळासाहेब शिंदे, महायुतीचे प्रमोद राहणे, काशिनाथ पावसे, राजन शिंदे, रौफ शेख, निलेश गुंजाळ, सचिन पावबाके, संकेत खुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले की, लोणी व परिसरातील चार ते पाच ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प राबवणारी लोणी ही ग्रामपंचायत संपूर्ण राज्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. संगमनेर खुर्द येथील कचरा डेपो कुरण येथे हलविण्या बाबत संगमनेर खुर्द करांनी मागणी केली आहे परंतु हा कचरा डेपो कुरण येथे हलविला तर तेथेही स्थानिक नागरिकांकडून आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे आधुनिकतंत्रज्ञान वापरून कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येईल याबाबत बैठकीमध्ये विचार विनिमय केला जाईल. अनेक वर्षांपासून या संगमनेर खुर्द भागातील नागरिकांनी अन्याय सहन केला असून आता महायुती सरकार त्यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहील आणि हा कचरा डेपोचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू, असा विश्वास मंत्री विखे यांनी दिला.

पथदिव्यांचा प्रकाश जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर पाडा
पुणे-नाशिक महामार्गाचे रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द प्रवरानदी पूला पर्यंत चौपदरीकरण होऊन पथदिवे लावण्याचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून झालेले आहे. या पथदिव्यांचा संगमनेर खुर्द व परिसरात चांगलाच प्रकाश पडलेला आहे. हा प्रकाश आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर सुद्धा पडला पाहिजे असेही विखे पाटील म्हणाले

महायुती सरकारच्या माध्यमातून जो निधी या विधानसभा मतदारसंघात आला आहे तो आपणच आणलाआहे. हे गावागावातील नागरिकांना पटवून देण्याचे काम महायुती कार्यकर्त्यांनी करावे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा होऊ द्या परंतु आपणउ फक्त निवडणुकांपुरते काम करत नाही तर 24 तास काम करत राहतो. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्ही कार्यरत असले पाहिजे. आरे ला कारे म्हणण्याची हिंमत तुमच्यात असली पाहिजे. संगमनेर खुर्दमध्ये काहीजण स्वतःला दादा समजत आहेत, त्यांची दादागिरी अजिबात सहन केली जाणार नाही. आम्हाला जास्त खोलात जायला सांगू नका. ग्रामपंचायतवरती आता प्रशासक बसले आहेत. त्यामुळे ज्या ज्या ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाला आहे तो बाहेर काढून त्यांना शिक्षा होईपर्यंत महायुतीकार्यकर्त्यांनी लढत राहावे असे आव्हान आमदार अमोल खताळ यांनी केले.
