आमच नाणं खणखणीत असल्यामुळेच संगमनेर तालुक्यात पाण्याचा खळखळाट –– जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

यापुर्वी तालुक्यातील दुष्काळाचे माॅडेल राज्यासमोर जात होते….

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यात सुरू असलेली विकास कामे ही महायुती सरकारच्या माध्यामातून पूर्ण होत आहेत. आमच नाणं खणखणीत असल्यामुळेच संगमनेर तालुक्यात पाण्याचा खळखळाट पाहायला मिळत आहे. भविष्यात तालुक्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीचे कामही मार्गी लावू अशी ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

तालुक्यात हिवरगाव पावसा येथे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुमारे १ कोटी रुपयांच्या निधीतून उर्ध्व प्रवरा उजव्या कालव्यावरील एक्सेप मधून पाणी सोडण्याचा आणि पुणे नासिक राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्याचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आमदार अमोल खताळ, शिवसेनेचे रामभाऊ राहाणे, राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, प्रमोद राहाणे काशिनाथ पावसे, गुलाब भोसले, राम जाजू, जनार्दन आहेर, सुशिल शेवाळे, रोहीत चौधरी, राजन शिंदे, संदीप देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्याने सर्वाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतू यंदा पाणी उपलब्ध असले तरी अल निनोचा धोका आपल्याला सांगितला असल्याने जून मध्ये पावसाचे प्रमाण कसे असेल यावरच धरणातील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. राज्यातील सर्वच धरणातील पाण्याच्या संदर्भात ३१ ऑगस्ट पर्यत पाण्याचा आढावा विभागाच्या वतीने घेण्यात येत असल्याचे विखे पाटील म्हणाले.

तालुक्यात यंदाच्या वर्षी टॅकरची मागणी नाही. कारण आवर्तनाचे नियोजन चांगले झाल्याचा परीणाम आहे. यापुर्वी तालुक्यातील दुष्काळाचे माॅडेल राज्यासमोर जात होते. महायुती सरकार राज्यात आल्यापासून आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यात पाण्याचा खळखळाट होत आहे. वर्षानुवर्ष पाण्याची प्रतिक्षा ज्या गावांना होती, त्यांना पाणी देता आल्याचे समाधान असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

   या तालुक्यात ज्या गोष्टी मागच्या काही वर्षात घडल्या नाहीत त्या सर्व पूर्ण करण्याच्या प्रयत्न आमदार खताळ करीत आहेत. महायुती सरकार तालुक्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. तालुक्यातील विकास कामे मार्गी लागण्यात झालेले परीवर्तन कारणीभूत आहे. हिवरगाव पावसा येथील बांधाऱ्यात आलेले पाणी आणि सुमारे ३ कोटी रूपयांचा पूलाचे झालेले काम आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल आशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली.

मागील वर्षभरात जे शब्द दिले ते पूर्ण होत आहेत. तालुक्यावरचा अंधार जात असून तालुका प्रकाशमान होत असल्याचा टोला लगावून मंत्री विखे पाटील म्हणाले की, इतक्या वर्ष फक्त भाषण ऐकली. परंतू तालुका विकासातून प्रकाशमान होत आहे. महायुती सरकारची भूमिका जनहितासाठी कटिबध्द आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी ३० लाख कोटी रूपयांची गुंतवणुक येत असताना जिल्ह्याला मोठी संधी आहे. संरक्षण उत्पादनात जिल्ह्याची नवी ओळख होत आहे. तालुक्यातील औद्योगिक विकासासाठी मोठे काम करायचे असल्याचेही ते म्हणाले.

आमदार अमोल खताळ म्हणाले की, संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर आणि परिवर्तन होण्याच्या आधीपासून आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलं पालकत्व घेऊन आपली प्रत्येक अडचण सोडवली. प्रत्येक विकासाच्या कामात आपल्या पाठीशी ठाम उभे राहीले. सांगायला आनंद होईल की, चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावर पुलाचे होणारे काम महायुती सरकारच्या माध्यमातून मार्गी लागले आहे. या पुलाची मागणी केली गेली होती त्यावेळेस स्थानिकांशी चर्चा करून पुलाच्या कामाचा निर्णय केला. आता कोण काय म्हणते याला गावातील कार्यकर्त्यानी उतर द्यावे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार असल्याने सर्व गावात निधी उपलब्ध होवून विकास काम होत आहेत. तरूणांच्या हाताला काम द्यायचे आहे. औद्योगिक वसाहतीसाठी जागेचे काम मार्गी लागणार असून कोणी काहीजरी कुचकूच करीत असले तरी सर्व कामे महायुतीची आहेत.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!