नगरपालिका सत्ताधाऱ्यांनी जनतेला वेठीस धरल्यास शिवसेना-भाजप महायुती गप्प बसणार नाही — आमदार अमोल खताळ 

केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवा — 

युवासेना मेळावा 

संगमनेर/प्रतिनिधी —

विरोधकांनी चाळीस वर्षात काय केले नाही हे सांगण्यापेक्षा आपण सव्वा वर्षात किती निधी आणला व किती विकास कामे केली हे तळा गाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम युवा सैनिकांनी करावे, असा सल्ला देतानाच नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी जनतेला वेठीस धरले तर महायुती गप्प बसणार नाही, असा इशारा देखील आमदार अमोल खताळ यांनी युवासेनेच्या मेळाव्यात दिला.

आमदार खताळ यांच्या हस्ते संगमनेर शहर आणि तालुक्यातील युवासेनेच्या ७० ते ८० पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी आयोजित युवा सेना मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर राहुल खताळ शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे, राजेंद्र सोनवणे, उप तालुका प्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, उपशहर प्रमुख अजित जाधव, महिला उपजिल्हा प्रमुख दिपाली वाव्हळ, भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, डॉ अभय बंगाळ, श्याम राहाणे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ, उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे शहर प्रमुख सार्थक शेवाळे, युवती शहर प्रमुख शिवाज्ञा अरगडे, घुलेवाडी शाखाप्रमुख ओंकार राऊत आदी उपस्थित होते. यावेळी असंख्य तरुणांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते युवा सेनेमध्ये प्रवेश करण्यात आला.

आमदार खताळ म्हणाले की, तालुक्यात मोठा विकास निधी येत आहे. शेतकरी कर्ज माफीबाबतही सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. मतदारसंघातील गावांना किमान ३० लाखांपासून ते २ कोटी रुपयांपर्यंत निधी देण्याचे काम केले आहे. पाणीप्रश्न सोडवण्यासाठीही आपला प्रयत्न सुरू आहे. नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी जनतेला वेठीस धरल्यास शिवसेना-भाजप महायुती गप्प बसणार नाही. नव्याने निवड झालेल्या सर्वच युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. याचबरोबर जे कोणी पक्ष विरोधी भूमिका मांडत असेल तर त्यांना क्षमा केली जाणार नाही, अशी तंबी आमदार अमोल खताळ यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित जाधव यांनी केले, प्रस्ताविक सौरभ देशमुख यांनी तर आभार सुशील शेवाळे यांनी मानले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!