महिला आरक्षणाच्या नावाखाली सत्ता टिकवण्याचा डाव – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

महिला आरक्षणाचे नाव पुढे करून मांडण्यात आलेली 131 वी घटनादुरुस्ती हा लोकशाहीवर मोठा आघात होता. तो हाणून पाडण्याचे काम विरोधी पक्षांनी केले आहे. जनगणनेशिवाय आरक्षण देणे अशक्य असताना भाजप केवळ स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी डीलिमिटेशनचा ( मतदारसंघ पुनर्रचना ) खेळ खेळत असल्याची टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. 

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच सत्ताधारी रस्त्यावर उतरत विरोधकांनी लोकशाहीची कशी हत्या केली, याबाबतची टीका करत आहेत. भाजपच्या या टीकेला प्रतित्युत्तर देण्यासाठी काँग्रेसही आता मैदानात उतरली आहे. थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.

भाजपचा महिला आरक्षणाचा केवळ मुखवटा असून हेतू मात्र राजकीय आहे, असे स्पष्ट करत यावेळी ते पुढे म्हणाले, 131 व्या घटनादुरुस्तीचा फेटाळलेला प्रस्ताव हा लोकशाहीचा विजय आहे. महिला आरक्षणाला काँग्रेसचा कधीही विरोध नव्हता, उलट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच महिला सबलीकरणाची पायाभरणी केली. काँग्रेसने महिलांना 33 टक्के आरक्षण दिले. याचबरोबर काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून महिलांना 50 टक्के आरक्षण दिले आहे.

भाजपने 2023 मध्ये महिला आरक्षणाचे बिल मंजूर केले, तेव्हा भाजपाने जनगणनेनंतर अंमलबजावणीचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप जनगणना झालेली नाही. महिला आरक्षणाचा केवळ मुखवटा वापरून, मतदारसंघ पुनर्रचनेद्वारे हिंदी पट्ट्यात 131 जागा वाढवून सत्ता काबीज करण्याचा भाजपचा ’प्लॅन’ आहे, अशी टीका त्यांनी केली. यामुळे दक्षिण भारतावर अन्याय होणार असून तिथे केवळ 44 जागा वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपचा हेतू चांगला नसून सत्तेसाठी ते काहीही करतात अशी टीका त्यांनी केली.

फडणवीसांचा ’खोटा आत्मविश्वास’

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना थोरात म्हणाले की, भाजप नेते खोटा आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. वादविवाद करण्यासाठी कुणी तोडीसतोड असण्याची गरज नाही, आमची सामान्य महिलाही त्यांना उत्तर देण्यास सक्षम आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच पिंपरी – चिंचवड सारख्या शहरात जनता सरकारवर रोष व्यक्त करत असताना सत्ताधारीच रास्ता रोको करत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

अनेकांनी सत्तेसाठी किंवा विविध चौकशी थांबवाव्यात म्हणून पक्षांतर केले काही वॉशिंग मशीन मधून स्वच्छ झाले आहेत अशी टीका केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!