पत्नीच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर सोनांबेकर हॉस्पिटलची सखोल चौकशी करण्याची मागणी…..

पती रोहिदास डोंगरे यांची पोलिसांकडे तक्रार.. 

संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेर येथील प्रसिद्ध डॉ. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका महिलेचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, हा मृत्यू हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आणि उपचारातील दिरंगाईमुळे झाल्याचा खळबळजनक आरोप महिलेच्या पती सहनातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी निमज येथील रोहीदास गणपत डोंगरे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार अर्ज दाखल केला असून हॉस्पिटलची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

तक्रारदार रोहीदास डोंगरे यांच्या पत्नी मिना डोंगरे यांना छातीत त्रास होत असल्याने २८ जानेवारी २०२६ रोजी सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ३० जानेवारी रोजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील सोपान हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र ८ फेब्रुवारी २०२६ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

तक्रारदार यांनी हॉस्पिटलवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, रुग्णाला ८०% ब्लॉक असताना इतर पर्यायांचा विचार न करता थेट अँजिओप्लास्टी का केली ? तसेच अँजिओप्लास्टी नंतर पुन्हा अँजिओग्राफी करण्याची गरज का भासली, असा सवाल उपस्थित केला आहे. आयसीयूमध्ये रुग्ण असताना युरिनची नळी निखळल्याने बेड ओला झाला होता, तरीही स्टाफने त्याकडे दुर्लक्ष केले. रुग्णाला उलट्या झाल्या असता नातेवाईकांनाच त्या साफ कराव्या लागल्या. यावेळी डॉक्टर किंवा कर्मचारी हजर नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

 दिनांक ३० जानेवारी रोजी रुग्णाचा एमआरआय करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. संगमनेर मधील ताजणे हॉस्पिटलमध्ये नंबर लावल्याचे सोनांबेकर हॉस्पिटलकडून सांगण्यात आले, मात्र नातेवाईकांनी स्वतः जाऊन चौकशी केली असता तिथे कोणतीही नोंद नव्हती. या दिरंगाईमुळे रुग्णाची प्रकृती अधिक खालावली, असा दावा डोंगरे यांनी केला आहे. नाशिकमधील रिपोर्टनुसार रुग्णाला निमोनियाची लागण आधीच झाली होती, परंतु सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून भलतेच उपचार करण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!