संगमनेर : वडगाव पान येथील भोंदूगिरी बाबत पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून कारवाई नाही…

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निवेदनात स्पष्ट उल्लेख 

वडगाव पान (दत्तधाम) येथील गडगे या भोंदू महाराजावर कारवाई करण्याची मागणी

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — 

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान गावामध्ये असणाऱ्या दत्तधाम येथील भोंदू गडगे महाराजांची भोंदूगिरी बंद करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सन 2020 पासून संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांकडे या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही कुठलीच कारवाई झाली नसल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे देखील यापूर्वीच तक्रार करण्यात आली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांना निवेदन देण्यात आले असून त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, महाराष्ट्रात अलीकडे भोंदू बुवा – बाबांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. दैवीशक्ती, चमत्कार, ज्योतिष किंवा अध्यात्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक, मानसिक, शारीरिक, आर्थिक, लैंगिक शोषण केले जात आहे.

वडगावपान (ता.संगमनेर जि.अहिल्यानगर ) येथे गडगे बाबा हा ‘दत्तधाम सरकार’ या नावाने आश्रम चालवतो तिथे मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरुष येतात. तिथे येणाऱ्या लोकांचे गडगे महाराज आर्थिक शोषण करतो, फसवणूक करतो, अध्यात्मिकतेच्या नावाखाली या बाबाने परिसरात दहशत निर्माण केलेली आहे. या बाबाकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसतांना तो लोकांना फसवे उपचार करतो. अनेक स्त्री-पुरुष तिथे मुक्कामाला रहातात. शेकडो लोकांनी आमच्याकडे (महाराष्ट्र अंनिस )तोंडी तक्रार केल्या आहेत. या बाबाच्या दहशतीमुळे लोक लेखी तक्रार करत नाहीत.

आपल्या कार्यालयाकडे या प्रकरणासंबंधाने २०२० पासून वारंवार पाठपुरावा (तोंडी ) केला आहे. अद्याप कारवाई झाली नाही. बाबाचे प्रस्थ मात्र वाढतच चालले आहे. या प्रकरणामुळे शासकीय यांत्रणेबाबतही लोकांमध्ये मोठी नाराजी व अपसमज निर्माण झाले आहेत.

भविष्यात ‘दत्तधाम सरकार’ ही खरात फाईल होऊ नये. गडगे बाबाची त्या दिशेने वाटचाल सुरु आहे. सबब या निवेदनाद्वारे आम्ही अशी मागणी करतो की, वडगावपान येथील गडगेमहाराज (दत्तधाम सरकार) यांच्यावर त्वरित कारवाई होऊन भोंदूगिरी बंद व्हावी. गडगे महाराज याचेवर ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, बोगस डॉक्टर्स ॲक्ट, जादूटोणा विरोधी कायदा, भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल व्हावेत.(महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जादूटोणा विरोधी कायदा प्रचार-प्रसार जनप्रबोधनासाठी आपल्या यंत्रणेसोबत काम करण्यास तयार आहे.) असे निवेदनात म्हटले आहे. ॲड. रंजना पगार – गवांदे, अशोक गवांदे, प्रशांत पानसरे, अमोल खरात आदींची नावे आहेत.

या संदर्भाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना देखील निवेदन देण्यात आलेले आहे 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!