पीआय, डीवायएसपी, डीएसपी सगळ्यांकडे हेलपाटे….. तरीही गुन्हा दाखल केला नाही !

संगमनेर : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू प्रकरण 

न्यायालयाच्या आदेशाने दाखल झाला गुन्हा — पोलिसांच्या भूमिकेबाबत उलट सुलट चर्चा..

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर येथील डॉक्टर अजिंक्य सोनांबेकर आणि अभिजीत कोरडे यांनी उपचारात बेदरकारपणे हलगर्जीपणा केल्यामुळे दत्तात्रय दळवी या रुग्णाचा मृत्यू झाला. याची फिर्याद देण्यासाठी फिर्यादीने संगमनेर शहर पोलीस निरीक्षक, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या, फिर्याद दिली, प्रत्यक्ष हेलपाटे मारले तरीही कोणीही दखल न घेता कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर मात्र फिर्यादीने न्यायालयाकडे दाद मागितली आणि न्यायालयाच्या आदेशानंतर संगमनेर शहर पोलिसांना वरील दोन डॉक्टर्सवर मृत्यूस कारणीभूत असा गुन्हा दाखल करावा लागला. फिर्यादीची झालेली हेळसांड, पोलिसांची संशयास्पद भूमिका याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.

सध्या संगमनेर शहरात सोनांबेकर आणि कोरडे या डॉक्टर जोडगोळीचे प्रकरण चर्चेत आहे. उपचारातल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरले म्हणून या दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा दाखल तेव्हाच झाला जेव्हा न्यायालयाने यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्या आधी मात्र फिर्यादी पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन, फिर्याद देऊन चकरा, हेलपाटे मारून अस्वस्थ झाले होते. शेवटी न्यायालयाचा आधार त्यांना घ्यावा लागला आणि न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर या सर्व प्रकरणाचे बिंग फुटले असून पडद्यामागे घडलेल्या विविध चाली बाहेर येऊ लागल्या आहेत. तसेच पडद्यामागील सूत्रधारांबाबतही आता चर्चा रंगली आहे. डॉक्टरांचे बडे नातेवाईक, सगे सोयरे यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणल्याची चर्चा असून गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी सहज पसार झाले आहेत. गुन्हा दाखल होऊन १० दिवस झाले असले तरीही अद्याप पर्यंत आरोपींना अटक केली जात नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या या गुन्ह्यातील भूमिकेबाबत सर्वत्र संशय व्यक्त होत आहे.

फिर्यादीने दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे लेखी फिर्याद दिली. फिर्याद दिल्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, म्हणून फिर्यादीने दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी पोलीस उपअधीक्षक संगमनेर यांच्याकडे फिर्याद दिली. परंतु त्यांच्याकडूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे फिर्यादीने दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे फिर्याद दिली. तेथे देखील कुठलीही दखल न घेतल्यामुळे न्यायालयात फिर्याद दाखल करणे भाग पडले. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिनांक 31 मार्च 2026 रोजी पोलिसांनी डॉक्टर सोनांबेकर आणि डॉक्टर कोरडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. डिसेंबर ते मार्च असे सुमारे 4 महिने फिर्यादीला पोलिसांकडे हेलपाटे मारावे लागले.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!