अमानुष मारहाणीमुळे पोलीस कोठडीत बाप लेकाचा मृत्यू…  

नऊ पोलिसांना फाशीची शिक्षा !

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

कोविड काळात पोलीस कोठडीतील पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे बाप लेकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने निकाल दिला असून तामिळनाडू पोलीस दलातील नऊ पोलिसांना दोषी धरण्यात येऊन त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना 2020 मध्ये घडली होती.

सदर घटना तुतीकोरिन जिल्ह्यातील सथानकुलमशी संबंधित आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी बाप लेकाला ताब्यात घेतलं होतं. मोबाईल ऍक्सेसरीजचे विक्रेते व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेन्निक्स यांचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. दोघांना १९ जून २०२० रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी करोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु होता. मोबाईल ऍक्सेसरीजचं दुकान ठरलेल्या वेळानंतरही सुरुच ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

संपूर्ण रात्र त्यांचा छळ करण्यात येवून पोलीस कोठडीत बाप लेकाला बेदम मारहाण करण्यात आली असल्याचे तपासातून समोर आले. अमानुष मारहाणीमुळे दोघांनाही गंभीर जखमा झाल्या. अति रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. जनतेतून या प्रकरणी मोठा उद्रेक झाल्यानंतर तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणात तमिळनाडू पोलीस दलातील ९ जणांना दोषी धरले आहे. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना अतिदुर्मीळ असल्याचे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. पोलिसांनी केलेला हा गुन्हा अतिशय निर्घृण आहे. असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

या प्रकरणात नऊ पोलिसांना दोषी ठरवण्यात आले. त्यात पोलीस निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक पी. रघु गणेश, के. बालकृष्णन यांचा समावेश आहे. हवालदार एस. मुरुगन आणि ए. समदुरई, हवालदार एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस, एस. वेलुमुथु यांचाही समावेश आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!