संगमनेरात कत्तलखान्यावर छापा…!
हप्तेखोर मात्र मोकाट…!!
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
संगमनेर पोलिसांनी शहरातील अवैध कत्तलखाने बंद असल्याचा कितीही कांगावा आणि देखावा केला तरी पुन्हा पुन्हा कत्तलखाने सुरू असल्याचे उघड होत आहे. हप्तेखोरीने स्थूल झालेले पोलीस वारंवार पितळ उघड पडूनही निर्ढावलेले दिसतात. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून असे हप्तेखोर मोकाट सोडल्याचे समोर येत आहे. स्थानिक गुन्हे शाखा एलसीबीने शहरातील भारत नगर मध्ये छापा टाकून 8 लाख 68 हजार रुपये किमतीचे गोवंश मांस आणि मुद्देमाल जप्त केला आहे.

एलसीबीने केलेल्या कारवाईमुळे संगमनेर पोलिसांचा कत्तलखान्याबाबतला हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड झाला असून अधिकाऱ्यांसह पोलिसांना कारवाईचे कुठलेही सोयर सुतक सुद्धा नसल्याचे यातून दिसून येत आहे. संगमनेर उपविभागाला वरिष्ठ अधिकारी असून अडचण नसून कोळंबा असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/ महादेव गुट्टे पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, विजय पवार, योगेश कर्डीले, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत या पथकाने ही कारवाई केली आहे.

संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत अजमत लतिफ कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) हा व साथीदार असलम बुढान कुरेशी (रा. संगमनेर) घराजवळ पत्र्याच्या आडोशाला गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला असता एका छोट्या टेम्पोमध्ये कत्तल केलेले गोमांस भरत असतांना आरोपी दिसून आले. मात्र गुप्त कारवाईत पोलिसांची चाहूल त्यांना लागल्याने ते गल्ली बोळामध्ये पळून गेले.

यावेळी पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले 1) निजम अय्याज कुरेशी (वय-21 वर्षे रा. गल्ली नं.02 मदिनानगर संगमनेर) 2) निसार रहेमान कुरेशी (वय-30 वर्षे रा. गल्ली नं.02 मदिनागनर, संगमनेर) 3) मोसीन असलम कुरेशी (वय-25 वर्षे रा. गल्ली नं.01 कादरीनगर संगमनेर जि. अहिल्यानगर) पळून गेलेल्या साथीदारांची नावे 4) अजमत लतिफ कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर(फरार), 5) कासिफ अनवर कुरेशी (रा.मदिनानगर, संगमनेर (फरार) अशी आहेत.

आरोपींच्या ताब्यातून 3 लाख 15 हजार रुपये किमतीचे 1 हजार 50 किलो गोमांस, 5 लाख 50 हजार -रु कि.चा एक पिकअप, 2 हजार रु की.चे दोन लोखंडी टोचे, चार चाकु, तीन काणस, 1 हजार रु.कि.चा एक इलेक्ट्रीक वजन काटा, असा एकुण 8 लाख 68 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 271/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3(5) सह प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 (अ), 5(ब),5(क), 9, प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
