शिपाई – लिपिकांनी विधान मंडळाची सुरक्षा वेशीला टांगली..!

एका आमदाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला….

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

पैशांच्या लोभापाई बनावट कागदपत्रांच्या आधारे विधानमंडळात प्रवेश करण्याचे पास देण्याचे अवैध कृत्य करून संपूर्ण विधानमंडळाची सुरक्षा वेशीला टांगण्याचे काम कार्यालयीन शिपाई व लिपिकांनी केले असल्याचे समोर आले असून हा धक्कादायक प्रकार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेस उघडकीस आला आहे. बृहन्मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या संदर्भात सात जणांवर गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक देखील केली आहे दोघेजण पसार आहेत. तर एका आमदाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बनावट पत्राच्या आधारे सुमारे 30 व्यक्तींना विधान मंडळात प्रवेश करण्याचे पास वितरित करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर येथील दत्तात्रय केशव गुंजाळ याला देखील पास वितरित करण्यात आला असून त्याच्या पासवर मुख्यमंत्री कार्यालयाचा सल्लागार असा उल्लेख करण्यात आला आहे. हे सर्व बनावट प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधान मंडळात बनावट कागदपत्रांच्या आधारे पास तयार करून ते पैशाच्या अमिषाने विक्री करून संपूर्ण मंत्रिमंडळाची विधानभवनाची सुरक्षा धोक्यात आणण्याचे काम शिपाई आणि लिपिकांनी केले आहे. यामागे षडयंत्र आहे का तसेच आणखी कोणाला असे पास वितरित केले आहेत काय याचा तपास आता पोलीस करीत असून देश आणि राज्याच्या सुरक्षेला बाधा येईल असे काम या आरोपींनी केले आहे.

बनावट पत्राबरोबरच वितरित करण्यात आलेल्या पासवर खोटे पदनाम देखील टाकण्याचा प्रताप या टोळीने केला असून गुंजाळ याला थेट मुख्यमंत्री कार्यालयाचा सल्लागार बनवून टाकले आहे. त्यामुळे असे पास करणाऱ्या टोळीची मजल कुठपर्यंत गेली आहे हेच यावरून दिसून येत आहे. असे पास तयार करणारी टोळीच असण्याची शक्यता असून आणखी असे प्रकार घडले आहेत काय याचा कसून तपास होण्याची गरज आहे.

 मंत्रालय सचिवालयातील आरोपी

1) गणपत भाऊ जावळे हा कामगार मंत्री यांच्या मंत्रालयातील कार्यालयात शिपाई आहे.

2) नागेश शिवाजी पाटील हा देखील तेथेच शिपाई आहे.

3) लवेश शंकर नाकटे हा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील समिती प्रमुख अल्पसंख्यांक कार्यालयातील शिपाई आहे.

4) महेश पिराजी दुम्पलवार हा सामान्य शाखा कक्षातील लिपिक टंकलेखक आहे. 

5) मनोज आनंदा मोरबाळे हा सामान्य शाखा कक्षातील लिपिक टंकलेखक आहे. 

6) स्वप्निल रमेश तायडे हा कार्यालयीन शिपाई आहे. 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!