डॉक्टर सोनांबेकर हॉस्पिटलचे अतिक्रमण भुईसपाट !
ठाकरे सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिकेची धडक कारवाई
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
उपचारादरम्यान हलगर्जीपणा करून रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सोनांबेकर हॉस्पिटल मधील डॉक्टर अजिंक्य सोनांबेकर व डॉक्टर अभिजीत कोरडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हॉस्पिटलने नगरपालिकेच्या ओपन स्पेस मध्ये अतिक्रमण केल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. हे अतिक्रमण त्वरित काढून टाकावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी नगरपालिकेकडे केले होती. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही दिला होता. त्यानंतर ॲक्शन मोड मध्ये आलेल्या नगरपालिकेने सदर ओपन स्पेस वरील अतिक्रमण भुईसपाट केले आहे.

नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली असून जेसीबीच्या साह्याने ओपन स्पेस मध्ये बांधण्यात आलेली संरक्षक भिंत (कंपाउंड वॉल) आणि त्यामध्ये बांधण्यात आलेली एक खोली काढून टाकण्यात आली असून संपूर्ण जागा मोकळी करण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान ओपन स्पेसमध्ये हॉस्पिटल प्रशासनाने टाकलेली भिंत आणि एका खोलीचे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पालिकेच्या पथकाने काढून टाकले आहे. सकाळी केलेल्या या कारवाईमुळे आता धन दांडग्यांच्या अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा जेसीबीच्या रूपाने पडला आहे. त्यामुळे सरकारी जागा बळकवण्याचा रुग्णालय प्रशासनाचा इरादा ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागणीनंतर प्रशासनाने हाणून पाडला आहे.

गेल्या महिन्याच्या अखेरीस सोनांबेकर हॉस्पिटलमधील डॉ. अभिजित कोरडे व डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेट दोघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. दोन्ही डॉक्टर बड्या मंडळींशी संबंधित असल्याने त्यांच्या अटके संदर्भात पोलीस प्रशासनावर मोठा राजकीय दबाव आल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शहरप्रमुख अमित चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांची भेट घेत एका निवेदनाद्वारे डॉ. सोनांबेकर यांनी सर्व्हे नंबर १११/३७ मधील ओपन स्पेस आणि रस्त्यावर केलेले अतिक्रमण त्वरित हटवून दंडात्मक कारवाई करावी व ती जागा स्थानिक नागरिकांसाठी मोकळी करून द्यावी, अशी मागणी केली होती. पालिकेने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

त्यानंतर गुरुवारी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या निर्देशानंतर पालिकेचे प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाचे महेश गोरडे, अल्ताफ शेख, ओंकार सहाणे, वैष्णवी गडाख, ज्योती आव्हाड, जयराम मंडलिक, राजू मस्के आदींच्या पथकाने घटनास्थळी जात सोनांबेकर हॉस्पिटल प्रशासनाने मागील बाजूला टाकलेल्या कंपाउंडची भिंत आणि एका खोलीचे केलेले बांधकाम काढून टाकले आहे.
