प्रशासकीय काळात आर्थिक डबघाईला आणलेल्या संगमनेर नगरपालिकेची वसुलीसाठी धडक मोहीम !

नगराध्यक्षांनी फक्त पत्रकबाजी करू नये ; 

त्यांची शंभर टक्के वसुली करणार काय ? नळ कनेक्शन तोडून मालमत्ता जप्ती करणार काय ?

 संगमनेर | प्रतिनिधी  

प्रशासकीय काळात आर्थिक डबघाईला आणून ठेवलेल्या संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुली साठी धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

संगमनेर नगर परिषदेच्या वतीने पाणीपट्टी व मालमत्ता कराच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत असून कराच्या वसुलीसाठी स्वतः मुख्याधिकारी हे प्रयत्नशील असून थकबाकीदारांवर कर भरण्याकरता स्वतः पुढाकार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरातील विविध भागात मोठी थकबाकी असणाऱ्या मालमत्ता कर धारकांकडे स्वतः भेट घेऊन कर भरण्याकरता आवाहन करीत आहेत. या मोहिमेंतर्गत शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या थकबाकीदारांना यापूर्वीच जप्तीच्या व नळ कनेक्शन कट करण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या असून या मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागातील कर न भरणाऱ्या मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या थकबाकी पोटी सुमारे बावीस कनेक्शन बंद करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली आहे.

सध्या मार्च अखेर असल्याने वसुली विभागाच्या कर अधिकारी श्वेता शिंदे, कर निरीक्षक बाजीराव नवले यांसह वसुली विभागातील सर्व कर्मचारी तसेच मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या थकबाकी दारांवर कारवाई करणाऱ्या इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत.

शहरातील विविध विभागातील कराची थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांना नोटीस देण्यात आलेल्या असून यापुढील काळात कोणतीही पूर्व सूचना न देता जप्तीची धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी सांगितले. विशेष वसुली मोहिमेंतर्गत या पुढील काळात दुकाने गाळे सीलबंद व रहिवासी मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन खंडित करणे, पेपर, बॅनर वर प्रसिद्धी तसेच जप्त झालेल्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. 

वसुली आणि कारवाईत समान न्याय ठेवणार का ?

विकासाच्या आणि कामाच्या फक्त वल्गना करताना सामान न्याय तत्वाचा वापर केला जात नसल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून दिसून आले आहे. मग ती कोणतीही मोहीम असो त्यात वशिलेबाजी केली जाते. समान न्याय दिला जात नाही. संगमनेर शहरातील अनेक घरमालकांनी, दुकानदारांनी मालमत्ताधारकांनी आणि त्यावर कळस म्हणजे प्रशासकीय मालमत्तांनी मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांची पाणीपट्टी, घरपट्टी मालमत्ता कर थकवलेले आहेत. विशेषतः प्रशासकीय थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यावर कोण कारवाई करणार ? वसुलीसाठी त्यांचे नळ कनेक्शन तोडून मालमत्ता जप्ती करण्यात येऊन लिलाव करण्यात येणार आहे का ? त्यांचे बॅनर लावून वृत्तपत्रात प्रसिद्धी देणार आहात काय ? काही विशिष्ट भागात वसुली न करता, राजकीय दबावाला बळी पडून सवलती दिल्या जातात या वशिलेबाजीवर नियंत्रण कोण ठेवणार ? नगराध्यक्षा तांबे यांनी फक्त प्रसिद्धीपत्रके देण्यापेक्षा समान न्याय पद्धतीने कारवाई आणि वसुली होते कि नाही यावर कृतीयुक्त लक्ष ठेवणे जरुरीचे आहे.

यापुढील काळात थकबाकीदारांवर करण्यात येणारी कारवाई तीव्र स्वरूपात करण्यात येणार असून थकबाकीदारांनी आपल्या कराचा वेळेत भरणा करावा व आपल्यावर होणारी संभाव्य कारवाई टाळावी व नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!