आमदार साहेब उर्फ नगराध्यक्षा…!!

आटपाट नगरीत नेहमीच वेगवेगळे चमत्कार घडत असतात. सध्या आटपाट नगरीचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. आपली वेगळी सुभेदारी निर्माण करण्यासाठी नव्याने निवडून आलेले नवे साहेब विशेष प्रयत्नशील आहेत. तर पारंपारिक सुभेदारांपासून वारसा मिळालेले युवराज साहेब राजकीय वर्चस्व कायमस्वरूपी ताब्यात अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या दोघांचाही राजकीय धुमाकूळ सध्या आटपाट नगरी सुरू आहे. असे असताना नव्यानेच जनपालिकेच्या अध्यक्षपदाची धुरा युवराजांच्या सौभाग्यवतींना रयतेने बहाल केली. मात्र या “अध्यक्षपदावर डल्ला” मारण्याचे काम युवराज करत असल्याचे चित्र सध्यातरी आटपाट नगरीत दिसून येत आहे.

 

प्रशासन काळात रयतेच्या नोकरांच्या ताब्यात असलेली आटपाट नगरीची जनपालिका या नोकरांनी चार वर्षे घातलेल्या बेलगाम धुमाकूळामुळे आर्थिक डबघाईला तर आलीच पण आटपाट नगरीच्या सर्व सोयी सुविधा समस्या मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवण्याचे काम या माजोरड्या नोकरांनी करून ठेवले आहे. हे सर्व निस्तरण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज तर आहेच मात्र कृतीची मानसिकता सत्ताधारी मंडळींमध्ये दिसून येत नाही.

सौभाग्यवती नगराध्यक्षा या जनपालिकेच्या कामाची धुरा सांभाळत असल्या तरी ‘पडद्याआडून मात्र पतीराज युवराज सोंगट्या खेळत’ असल्याचा आरोप रयतेतील ठराविक पारंपरिक विरोधक करीत आहेत. याबाबतच्या तक्रारी परगाण्याच्या प्रशासन प्रमुखाकडे देखील करण्यात आल्या आहेत. अद्याप त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. अशा तक्रारींना सरळ उधळून लावत युवराज आपले काम मात्र जोरात आणि जोमाने करीत आहेत.

युवराजांनी अथक प्रयत्नांनी आटपाट नगरीच्या जनपालिकेची सत्ता मोठ्या विजयाने मिळवली असली तरी आणि सौभाग्यवती नगराध्यक्ष असल्या तरी जनपालिकेच्या कामात किती हस्तक्षेप असावा यावर निदान मर्यादा असायला हव्यात अशा प्रतिक्रिया रयतेतील जाणकार मंडळींकडून व्यक्त होतात. नाहीतर जनपालिकेचे नगराध्यक्षपद प्रभावीपणे भूषवण्याचे काम करणाऱ्या आपल्या मातोश्रींची कार्य कुशल सेवा आणि आदर्श कामानंतर हस्तक्षेपाचा आणि नगराध्यक्षांवर दबाव ठेवल्याचा प्रकार रयतेसमोर सातत्याने दिसत राहील. याची दक्षता घेण्याची गरज आहे.

युवराज यांच्या मातोश्री तर रयतेने निवडून दिलेल्या आटपाट नगरीच्या पहिल्या नगराध्यक्ष होत्या. त्या देखील नव्या आणि नवख्या होत्या. त्यांचे पतीराज आमदार असताना त्यांनी नगरपालिकेत थेट हस्तक्षेप केल्याचे चित्र मात्र रयतेला दिसले नाही. त्यांच्या कार्यक्रमात आणि कार्यात कुठेही थेट प्रवेश करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न देखील केल्याचे चित्र दिसले नाही. असे असताना त्यांनी अनेक वर्ष चांगला कारभार केला. या सर्व कारभाराचेच फळ जनपालिकेच्या निवडणुकीतून मिळाले आहे. विशेष म्हणजे या सर्वांवर राजकीय नियंत्रण असलेले आटपाट नगरीचे ज्येष्ठ सुभेदार माजी मंत्री यांनी देखील महिला नगराध्यक्षांच्या कामात थेट हस्तक्षेप केल्याचे चित्र नाही.

सध्या मात्र “आमदार मीच आणि नगराध्यक्षही मीच” असे चित्र रयतेसमोर स्पष्टपणे येत असल्याचे दिसते. आटपाट नगरी सारख्या जागृत रयत असलेल्या महत्त्वाच्या जनपालिकेतील नगराध्यक्षांच्या अधिकारांवरच ठेवलेले वर्चस्व यामुळे सौभाग्यवतींचे ‘नगराध्यक्ष पद हे शोभेचे पद’ व्हायला नको. त्यांचे “पद फक्त इव्हेंट पुरते मर्यादित” ठेवणे घराण्याच्या राजकीय परंपरेला शोभण्यासारखे नाही. संधी मिळाल्यानंतर आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याची संधी त्यांना देण्याची गरज आहे. अर्थात असा प्रकार सर्वत्रच आढळून येतो. मात्र राजकीय महत्त्वाच्या पदावर असलेल्या महिलांच्या कार्यावर वर्चस्व ठेवण्याचे काम पडद्याआडून करायचे कि थेट समोर येऊन करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!