संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांना हवी आहे बदली !…

अर्ज केले पण अद्याप मंजुरी नाही !!

राजकीय दबाव ; अमली पदार्थ तस्करी, गुन्हेगारी वाढली…

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या “राजकीय हॉटस्पॉट” असलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना बदली हवी असल्याची माहिती समजली असून त्यांनी बदलीसाठी तीन वेळा वरिष्ठांकडे अर्ज केल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र त्यांच्या मागणीला अद्याप पर्यंत मंजुरी मिळाली नसल्याचे खात्रीलायक वृत्त समजले आहे.

संगमनेर तालुक्यातील राजकीय उलथापालथीनंतर संगमनेरातील सर्वच प्रशासकीय विभाग, पोलीस खाते आणि त्यांचे खाते प्रमुख प्रभारी अधिकारी त्यांचा एकूण कारभार असे सर्वच राजकीय निशान्यावर आले. दोन-चार बड्या राजकीय नेत्यांच्या झुंजीत पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे दबाव वाढू लागला. त्यामुळे अनेक घटना घडल्या. घडविल्या गेल्या. त्याचे खापर वेळोवेळी अधिकाऱ्यांवर देखील फोडण्यात आले. काही घटनांना अधिकारी देखील जबाबदार असल्याचे समोर आले.

जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, विद्यमान आमदार अमोल खताळ पाटील, आमदार सत्यजित तांबे या सर्वांचे राजकीय घुमशान सध्या संगमनेर तालुक्यात सुरू आहे. ‘राजकीय वर्चस्वाच्या कचाट्यात संगमनेरचे प्रशासन, पोलीस विभाग दळून निघत असल्याचे देखील बोलले जात असून या सर्वांच्या राजकीय भूमिकेची चर्चा होत आहे’. 

संगमनेर शहरात गेल्या एक वर्षापासून अमली पदार्थ ड्रग्स तस्करी, विक्रीने आणि व्यापाराने धुमाकूळ घातला आहे. त्यामध्ये काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आरोपी म्हणून सापडल्याने ‘आरोप प्रत्यारोपांच्या धुरळ्यात’ पोलिसांवर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आणण्याचे प्रकार होऊ लागले. अमली पदार्थांच्या कारवायांमध्ये राजकीय पक्षाशी, पुढार्‍यांशी, आजी माजी नेत्यांशी संबंधित असलेले कार्यकर्ते आरोपी म्हणून डिटेक्ट आले. काही जणांना पकडण्यात आले. त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले. थेट विधानसभेत आरोप करण्यात आले. त्यातच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे देखील संगमनेरवर विशेष लक्ष असल्याने पोलीस आणि प्रशासन सर्वच प्रकारच्या अडचणीत तारेवरची कसरत करीत असल्याचे सांगितले जात आहे. 

संगमनेर शहरातली वाढती गुन्हेगारी, दादागिरी, गुंडांच्या टोळ्या, अमली पदार्थांची विक्री – तस्करी, अवैध कत्तलखाने, गोवंश हत्या, गांजा गर्द यावरील मोठ्या कारवाया, घरफोड्या, चोऱ्या, सशस्त्र हल्ले असे प्रमाण सातत्याने वाढते आहे. शहरात अमली पदार्थावर गेल्या वर्षभरात मोठ्या कारवाया झाल्या. यामध्ये संगमनेर शहराबाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याचे आढळून आले आहे. तसेच संगमनेर शहरातील अतिशय कुप्रसिद्ध असलेल्या अवैध कत्तलखान्यांमधून होणारी गोवंश हत्या आणि गोवंश मांसाची होणारी तस्करी संगमनेर शहर पोलीस रोखू शकले नाहीत. या ठिकाणी देखील अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनीच कारवाया केल्या आहेत. संगमनेर शहर पोलीस मात्र निवांत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. 

डीबी च्या टोळीचा त्रास…

घडलेल्या गुन्ह्यानंतर आरोपींचा शोध लावण्यात, तपास करण्यात संगमनेर शहर पोलीस कमी पडल्याचे दिसून येत आहे. अनेक गुन्हे आजही तपासावरच आहेत. पोलिसांना त्यात कुठलाही शोध लागलेला नाही. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिका देखील संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. याआधी आणि पूर्वी न्यायालयाने देखील तपासाच्या संदर्भात पोलिसांना फटकारले आहे. अनधिकृतरित्या निर्माण करण्यात आलेली संगमनेरची डीबी शाखा नेमके काय काम करते हा देखील संशोधनाचा विषय आहे. ही शाखा फक्त वसुलीसाठीच वापरली जात असल्याचे आरोप होत आहेत. या शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी टोळी असल्याप्रमाणे वागत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात. नेमका कोणता तपास या डीबी शाखेकडून केला जातो यावर वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करून चौकशी करणे गरजेचे आहे. 

या सर्व प्रकारात पोलीस यंत्रणेचे पोलिसिंग बंद झाले आहे. वाहतुकीचे आणि वाहतूक पोलीस शाखेचे तीन तेरा वाजले आहेत. शहरात अवैध प्रवासी वाहतूक, वाहतुकीचे अडथळे, अमली पदार्थ असे अनेक प्रकार वाढले, अनेक गुन्हे घडत आहेत. राजकीय नेत्यांच्या राजकीय झुंजीचा फायदा घेणारे अधिकारी देखील संगमनेरात आहेत. अशा अनेक अवैध प्रकारांना नियंत्रणात आणण्याची स्वतःची जबाबदारी असून देखील वैतागलेले पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे या ठिकाणाहून बदलून जाण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात असून तसा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे देखील समजले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!