डोंगरांना आग लावू नका ; वनसंपदा जपा – दुर्गाताई तांबे

संगमनेर | प्रतिनिधी —

उन्हाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी डोंगरांना आगी लावल्या जातात. यामुळे विविध वृक्षांसह नैसर्गिक वनसंपदेची मोठी हानी होत असते. वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून कोणीही डोंगरांना आगी लावू नका उलट चुकून वनवा लागल्यास तात्काळ वन विभाग व ग्रामपंचायत कार्यालयास कळवा. आपल्या वनसंपदेची काळजी घ्या असे आवाहन संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा तथा दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विविध डोंगरांवर आगी लागण्याचे प्रमाण वाढले असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. वनसंपदेच्या रक्षणाबाबत आवाहन करताना तांबे यांनी म्हटले आहे की, पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची मूलभूत जबाबदारी आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात ऑक्सिजन आणि वनराईचे अत्यंत महत्त्व आहे. कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची कमतरता जगाने अनुभवली आहे. हा कटू काळ अत्यंत धोकादायक होता त्यावर प्रभावी मात करण्याकरता वृक्षारोपण संवर्धन हे अत्यंत गरजेचे आहे ही संस्कृती आपण वाढवली पाहिजे.

मात्र अनेक ठिकाणी डोंगरांना आगी लावण्याचा प्रकार होत आहे. निष्काळजीपणे शेकोटी पेटवणे. डोंगरांमध्ये कचरा पेटवणे यातून डोंगरांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये अनेक डोंगरांना आग लागली असून यामुळे वृक्षांची मोठी हानी झाली आहे. त्यामधून पर्यावरण धोक्यात येत आहे. लहान लहान झाडे नष्ट होत आहेत. मोठी झाडे होरपळून जात आहे. वन्य जीव नष्ट होत आहेत. निसर्गचक्र थांबत आहे. असे होणे दुर्दैवी आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून भावी पिढीच्या रक्षणाकरता दंडकारण्य अभियान सुरू झाले. लोकनेते बाळासाहेब थोरात व डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने या अभियानात सहभाग घेऊन ही मोठी लोक चळवळ केली. हे अभियान संगमनेर तालुक्याची ओळख बनली. आजही विविध डोंगरांवर वृक्ष जगवण्यासाठी दंडकारण्य अभियान समितीच्या माध्यमातून सातत्याने काम सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये टँकरद्वारे पाणी टाकून अनेक वृक्ष जगवली जात आहेत.

मात्र काही ठिकाणी डोंगरांना लागलेल्या आगी मुळे वनसंपदेचे मोठे नुकसान होत असून नागरिकांनी हिरवाई वाचवण्यासाठी सतर्क रहावे. तसेच डोंगरांना आग लागल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा. तालुका जिल्हा स्तरावरील वन विभागाने अत्यंत जागरूक राहून गस्त वाढवण्याबरोबर संशयतांवर कठोर कारवाई करावी. आपले डोंगर आपले पर्यावरण या अभियानात सर्व ग्रामस्थ व नागरिकांनी सुद्धा सहभाग घ्यावा असे आवाहन दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!