‘मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा’ उपक्रमातून वैचारिक जागर….!

प्रा. उल्हास पाटील यांच्या तीन ग्रंथांचे दिमाखदार प्रकाशन

​ संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून केवळ जल्लोष न करता, शिवरायांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावेत, या उदात्त हेतूने चाळीसगाव येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा’, ‘महाराणा प्रताप ट्रस्ट’ व ‘चाळीसगाव सांस्कृतिक मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात प्रा. उल्हासदादा पाटील (संगमनेर) यांच्या तीन नवीन पुस्तकांचे दिमाखदार प्रकाशन करण्यात आले.

​लक्ष्मीनगर येथील राजपूत मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याने चाळीसगावच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घातली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी अप्पर आयकर आयुक्त ॲड. उज्ज्वलकुमार चव्हाण म्हणाले की, “राजकीय आणि सामाजिक जीवनात अहोरात्र सक्रिय असतानाही साहित्याची ओढ जपणारे प्रा. उल्हासदादा पाटील यांच्यासारखे नेतृत्व दुर्मिळ आहे. त्यांची ही पुस्तके भावी पिढीसाठी दिशादर्शक ठरतील.”

​याप्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांनी पुस्तकातील विषयांवर भाष्य करताना, हा सोहळा म्हणजे ‘नव्या वैचारिक उपक्रमाची नांदी’ असल्याचे गौरवोद्गार काढले.

​जलसंधारणासोबतच विचारांची पेरणी

‘पाच पाटील टीम, चाळीसगाव’ यांच्या वतीने या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते. ‘मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा’ या अभियानांतर्गत जलसंधारणाचे कार्य करत असतानाच, समाजात वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि प्रगल्भ विचार रुजावेत, या उद्देशाने या पुस्तक प्रकाशनाला विशेष महत्त्व देण्यात आले.

या सोहळ्याला डॉ. संग्राम पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. चंद्रकांत ठाकरे, शेकापचे जिल्हाध्यक्ष गोकुळ पाटील, ह.भ.प. रत्नमालाताई पाटील, सहकार बोर्डाचे जिल्हाध्यक्ष मा. प्रदीपदादा देशमुख, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, महाराणा ट्रस्टचे ठानसिंग आप्पा पाटील, डॉ. विनोद कोतकर, दिलीप सावंत, विजय पाटील यांसह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, साहित्यिक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!