देवगड ते देवतळे शिवरस्ता एका वर्षात खुला
आमदार अमोल खताळ यांनी केली वचनपूर्ती
संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थानपासून देवतळे येथील खंडोबा देवस्थानाकडे जाणारा हिवरगाव पावसा, निमगाव टेंभी आणि देवगाव शिवरस्ता अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत होता. रस्ता खुला नसल्यामुळे खंडोबा भक्तांना देवस्थानच्या दर्शनासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब खंडोबा भक्तांची मागणी लक्षात घेऊन महसूल विभागाने आमदार अमोल खताळ यांच्या सूचनांवरून अवघ्या एका वर्षात सर्व प्रक्रिया पूर्ण करत हा शिवरस्ता अधिकृतपणे खुला करून वचनपूर्ती केली असल्याची माहिती आमदार खताळ यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ मागीलवर्षी देवतळे येथे खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी चंदनापुरी येथील खंडोबाभक्त व शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, जय मल्हार ग्रुपचे प्रमुख आणि चंदनापुरी येथील कामगार पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे, आचारी किशोर रहाणे, संजय रहाणे, जालिंदर पावसे या खंडोबा भक्तांनी शिवरस्ता खुला करण्याची मागणी आमदार खताळ यांच्याकडे केली होती. एक वर्षात हा रस्ता खुला करून दिला जाईल, असे आश्वासन दिले होते.

त्यानंतर त्यांनी हा रस्ता तातडीने खुला करून खंडोबाभक्तांची अडचण दूर करा असे निर्देश तहसीलदार धीरज मांजरे यांना दिले होते. तहसीलदार मांजरे यांनी संगमनेर खुर्द येथील महसूल मंडळ अधिकारी आरती साठे आणि तलाठी मयुरी मुन्तोडे यांना पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर तहसीलदार मांजरे यांनी प्रत्यक्ष स्थळभेट देऊन संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि जमीनधारकांना नोटिसा दिल्या. या बाबत परिसरातील शेतकऱ्यांशी दोन ते तीनवेळा बैठका घेऊन हा शिवरस्ता खुला होणे गरजेचे असल्याचे पटवून दिले.

देवगाव येथील संतोष बाबासाहेब कोटकर व लक्ष्मण बबन कोटकर यांच्या शेतातून हा शिवरस्ता जात असल्याने तुमच्या शेतातून रस्ता नेण्याची संमती द्यावी अशी विनंती तहसीलदार मांजरे यांनी कोटकर बंधूंना केली, त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने सामाजिक बांधिलकी दाखवत रस्त्यास संमती दिली. या कामासाठी देवगावचे कामगार पोलीस पाटील अजय पावसे, सोसायटी अध्यक्ष माधव लामखडे, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर शिंदे, उपसरपंच सुनील शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे तसेच पाटील रमेश वर्पे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे, सरपंच सुभाष गडाख, गणेश दवंगे, दशरथ पावसे यांनी विशेष सहकार्य केले.
महसूल विभागाच्यावतीने अवघ्या एका दिवसात सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांबीचा शिवरस्ता तयार केला.
