विशेष श्रमसंस्कार शिबिरातून घडतो व्यक्तिमत्त्व विकास – डॉ.सुधीर तांबे

संगमनेर | प्रतिनिधी 

साकूर येथील रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन कामटवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्टचे सदस्य दिपकजी फिरोदिया हे होते.

डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनात शिबिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते. शिबिराच्या काळात होणाऱ्या विविध उपक्रमांतून ग्रामविकासाला हातभार लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील समस्या जाणून घेता येतात आणि विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व कळते. त्याचबरोबर’विशेष श्रमसंस्कार शिबिरातून व्यक्तिमत्त्व विकास होतो.

अध्यक्षीय भाषणात दिपक फिरोदिया यांनी सांगितले की, श्रम संस्कार शिबिर केवळ सात दिवसांचा मुक्काम नसून, तो तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा समाजाच्या प्रत्यक्ष मातीत मिसळून जे शिक्षण मिळते, ते जास्त समृद्ध असते. ‘श्रमसंस्कार’ या शब्दातच श्रमाचे महत्त्व दडलेले आहे. या शिबिराच्या माध्यमातून तुम्ही कामटवाडी गावातील ग्रामस्थांच्या सोबतीने स्वच्छता, जलसंधारण किंवा सामाजिक जनजागृतीची जी कामे कराल, त्यातून तुम्हाला श्रमप्रतिष्ठा कळेल.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत व राज्यगीताने करण्यात आली. प्राचार्या डॉ. हेमलता राठोड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर यांनी शिबिराची प्रास्ताविकातून भूमिका मांडली. पाहुण्यांचा परिचय डॉ. सचिन घोलप यांनी करून दिला.

या प्रसंगी मुख्याध्यापक मारूती घुले, ग्रामस्थ आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरजू शेख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. रंजित गिरी यांनी मानले. राष्ट्रगीताने उद्घाटन समारंभाची सांगता झाली.

पुढील सात दिवस या शिबिरामध्ये प्रा.जमिल शेख (पाणी आडवा पाणी जिरवा), प्रो.डॉ.बाळासाहेब वाघ( प्राचार्य, बी.एस.टी.महाविद्यालय ) जैवविविधता, प्रा.शिवनाथ तक्ते ( बालविवाह ), प्रा.राजेंद्र हिंगे ( राष्ट्रीय सेवा योजनेने मला घडविले ),डॉ.सचिन घोलप( सायबर सुरक्षा ),प्रा.विजय सोनवणे (भारतीय परंपरेतील विज्ञान), मा.अनिल देशपांडे ( काळजाचा ठाव घेत काव्यगझल ), प्रो.डॉ.हेमलता राठोड ( महिला सक्षमीकरण ), डॉ.सुचित्रा गायकवाड ( मानसिक आरोग्य ) अशा विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर यांनी दिली.

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!