संगमनेर साठी महत्त्वाची नाशिक पुणे रेल्वे बाहेरून कशी चालली ते सांगा — माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सवाल 

मागील एक वर्षात शहरात नको ते घडते आहे  

शहरात वाढलेली अमली पदार्थांची तस्करी व गुंडगिरी चिंताजनक

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर शहराला निळवंडेतून थेट पाईपलाईन द्वारे स्वच्छ पाणी मिळते आहे. शहरात विकासाच्या योजना राबविल्या आहेत. शांतता, सुव्यवस्था यामागे कुणाचे तरी कष्ट आहेत हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. आपण शहर जपले. मात्र मागील एक वर्षांमध्ये शहरांमध्ये अस्वस्थता वाढली असून अमली पदार्थांची तस्करी व दहशत वाढली आहे. हे थोपवण्याची जबाबदारी जनतेची असून संगमनेर साठी महत्त्वाची असणारी नाशिक पुणे रेल्वे दुसऱ्या तालुक्यात मधून चालली कशी हे पहिले सांगा असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

जनता नगर मध्ये संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे डॉ. किशोर पवार, बाळकृष्ण महाराज करपे, हिरालाल पगडाल ज्ञानेश्वर राक्षे, गिरीश गोरे, तुषार वनवे, वैष्णव मूर्तडक, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, इंजिनिअरिंग कॉलेज ते बस स्थानक हा अद्यावत रस्ता आपण पूर्ण केला. याचबरोबर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना राबवली. याकरता अनेकदा शेतकऱ्यांच्या विनवण्या कराव्या लागला. सातत्याने निधी मिळवला. आज स्वच्छ पाणी मिळते आहे यामागे कोणाचे तरी कष्ट आहे. तीस वर्षांमध्ये नगरपालिका अत्यंत आदर्श पद्धतीने चालवली .विकासाचे मोठमोठी कामे केली .शहरात शांतता सुव्यवस्था, वैभव निर्माण केले.

मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर मध्ये अशांतता आहे. अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. धर्माच्या नावावर काळे धंदे सुरू आहेत. मागील आठवड्यामध्ये एका तरुणाचा हात तुटला. हात तुटलेला तरुण आणि तोडणारा कोण होता हे तपासले पाहिजे. शहरांमध्ये ड्रग्स, इंजेक्शन, नशील्या गोळ्या उपलब्ध होत आहे. अमली पदार्थांचा माफिया बस स्थानकासमोर सभेमध्ये म्होरक्या होतो आहे. बाहेरची प्रवृत्ती आपल्याला संगमनेर मध्ये येऊ द्यायची नसून सर्वांनी आपले संगमनेर वाचवण्यासाठी एकत्र राहणे गरजेचे आहे.

याचबरोबर नाशिक पुणे रेल्वे साठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. पोखरी हवेली येथे रेल्वे स्टेशन साठी जागा नियोजित केली. सर्व नियोजित असताना आता ही महत्त्वाची रेल्वे बाहेरून जाते कशी हे पहिले सांगा असे आव्हान त्यांनी केले.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात सातत्याने विकासाच्या योजना राबवले आहेत. सेवा समितीच्या वतीने 20 नवीन व 11 अनुभवी उमेदवार दिले आहेत. संगमनेर शहराला स्वच्छ पाणी मिळत असून आगामी काळामध्ये एकाच वेळी पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी काम केले जाणार आहे. हे पाणी 50 ते 150 टीडीएस ची असून अत्यंत शुद्ध आहे. राज्यामध्ये अशी कुठेही पाणी नाही. संगमनेरच्या मिळणाऱ्या पाण्यावर इतर शहरांच्या निवडणुका लढवल्या जातात. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा आदर सर्वपक्षीय नेते करतात कोणत्याही मंत्र्याकडे गेले तर निधीसाठी कोणीच नाही म्हणत नाही. निधी साठी पाठपुरावाला करावा लागतो. विकास कामांसाठी निधी आणण्यात आमची पीएचडी झाली असल्याचे आमदार तांबे यांनी म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!