माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे निळवंडेचे पाणी चिंचोलीत दाखल
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 25
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तळेगाव सह दुष्काळी भागातील जनतेला निळवंडे चे पाणी देण्यासाठी मोठे काम केले. कालव्यांमधून गावागावात पाणी देण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून यंत्रणा देऊन पाणी पोहोचवले असून थोरात यांच्या प्रयत्नातून निळवंडे धरणाचे पाणी थेट चिंचोली गावात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


निळवंडे धरण हे तळेगाव सह दुष्काळी भागाला वरदान ठरणारे आहे. हे धरण व कालवे पूर्ण करणे हा जीवनाचा ध्यास म्हणून बाळासाहेब थोरात यांनी मंत्री पदाच्या कारकिर्दीत धरण व कालवे पूर्ण केले. मागील दोन वर्षांमध्ये दुष्काळी गावांमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी काम केले. संपूर्ण काम करून ठेवले होते मात्र सत्ता बदलली. तरीही या जनतेला पाणी देण्यासाठी थोरात कटिबद्ध राहिले असल्याचे सांगितले जात आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा व पाईप देऊन विविध गावांसाठी मोठमोठ्या चाऱ्या निर्माण केल्या. यासाठी कारखान्याची यंत्रणा रात्रंदिवस काम करत होती. कर्मचाऱ्यांनी जेसीबी पोकलँड यांसह कारखान्याने चर खोदून त्यामध्ये पाईप टाकून दिले आहे. या चर खोदणीमुळे मागील वर्षीपासून देव कवठे, मलढोण सायाळे या गावांना पाणी मिळत आहे. इतर गावांनीही मागणी केल्यानंतर कारखान्याचे यंत्रणांनी त्यांना मोठी मदत केली.

कालव्यापासून चिंचोली गुरव नदीपर्यंत चार किलोमीटरच्या अंतरा करता मोठी चारी खोदण्यात आली असून दोन बंधारे व तीन नद्या ओलांडून हे पाणी अखेर चिंचोली गावात दाखल झाले आहे. मागील काही वर्षांचे स्वप्न साकार झाल्याने संपूर्ण नागरिकांनी मोठ्या आनंदाने पाण्याचे स्वागत केले आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाणी आल्याचे मोठे समाधान असल्याचे सरपंच विलास सोनवणे यांनी म्हटले आहे. हे पाणी आणण्यासाठी गावातील ग्रामस्थांसह कारखान्याच्या यंत्राने मोठी मदत केली असून नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
