संगमनेर हनुमान जयंती रथयात्रेला धक्काबुक्की,वादाचे गालबोट !
संगमनेर प्रतिनिधी दि. 12
ब्रिटिशांना आव्हान देत संगमनेरच्या धाडसी महिलांनी श्री हनुमानाचा रथ ओढून संगमनेरातील पारंपारिक हनुमान जयंती रथ उत्सव पार पाडला होता. या ऐतिहासिक दाखल्याभोवती अनेक वर्षापासून फिरणारी आणि संगमनेरच्या गाव हनुमानाची ही रथयात्रा यंदाच्या वर्षी ढोल ताशा वाजविणारे पथक कार्यकर्ते आणि हनुमान जयंती उत्सव समितीच्या काही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याने वादग्रस्त ठरली असून जयंतीला गालबोट लागले आहे.

संगमनेरच्या हनुमान जयंतीला ऐतिहासिक परंपरा आहे. या परंपरेनुसार शहरात चंद्रशेखर चौकात म्हणजेच परदेशपुऱ्यात असणाऱ्या मोठ्या हनुमान मंदिरातून रथयात्रा निघते. संगमनेरात अनेक मारुती मंदिरे असली तरी या मंदिराला मोठे हनुमान मंदिर म्हटले जाते आणि हा हनुमान संपूर्ण गावचा हनुमान म्हणून ओळखला जातो. यात्रा उत्सव मोठ्या आनंदाने भरवला जातो. ब्रिटिश आणि महिलांचा संघर्ष याचा इतिहास सर्वश्रुत आहे. फार पूर्वी हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री “छबिना” कार्यक्रम असायचा. अत्यंत मोठ्या आनंदात उत्साहात साजरा होणारा हा छबिना कार्यक्रम अशाच वादग्रस्त धक्काबुक्क्या, शिवीगाळ आणि वादांनी बंद करण्यात आला आहे.

यंदाच्या वर्षी संगमनेरातल्या स्थानिक ढोल ताशा पथकाने सलामी देण्याच्या कारणावरून वाद झाला असल्याची प्रथम दर्शनी माहिती मिळाली आहे. स्थानिक पथकाला या ठिकाणी हनुमान जयंती साठी ढोल वाजवण्यास मज्जाव केल्याने समितीचे काही कार्यकर्ते आणि ढोल पथकातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, धक्काबुक्की, वादविवाद मोठ्या प्रमाणावर झाला. अगदी महिलांनी रथयात्रा ओढण्यास सुरुवात केल्यानंतर ही घटना घडली. शहराचे पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना यात हस्तक्षेप करून हा वाद तात्पुरता थांबवावा लागला. संगमनेरचे नवे आमदार अमोल खताळ रथावर उभे राहून हा घटनाक्रम पाहत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. पारंपारिक पद्धतीने चालणाऱ्या रथोत्सवाला आणि हनुमान जयंतीला यावर्षी वेगळ्याच कारणाने गालबोट लागले आहे.
