माजी आमदार थोरात यांच्या मर्जीतल्या निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश — आमदार अमोल खताळ पाटील
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक
संगमनेर दि. 30 — प्रतिनिधी
आमदार अमोल खताळ पाटील यांनी नुकतीच संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संगमनेर तालुक्यातील विविध कामांबाबत माहिती घेतली. अनेक वर्षांपासून रखडलेली कामे आणि निकृष्ट, दर्जाहीन काम करणाऱ्या माजी आमदार थोरात यांच्या मर्जीतील ठेकेदारांवर थेट कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सोशल मीडियातून दिली आहे.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी खालील प्रमाणे म्हटले आहे ते जसेच्या तसे…
संगमनेर मतदारसंघात अनेक वर्षांपासून रखडलेली कामे अद्यापही जैसे थे आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग , जिल्हा परिषद सा.बां उपविभाग संगमनेर,प्रधान मंत्री ग्रामसडक योजना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून या सर्व प्रलंबित कामांचा आढावा घेतला.

मागील ४० वर्षे सत्ता गाजवणारे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे मर्जीतील ठेकेदार यांनी जाणूनबुजून अनेक विकासकामे प्रलंबित ठेवले आहेत. या प्रलंबित विकासकामांचे दर ५ वर्षाला भांडवल करून ते निवडून येत होते. पण त्यांनी आतापर्यंत आपली फसवणूक करून मोठा घात केला अस नागरिकांच्या लक्षात आलं. त्यामुळे जनतेने आता त्यांना कायमचं घरी बसण्याची शिक्षा दिली आहे. तसेच कामे घेऊन काम न करणारे, निकृष्ट काम करणारे त्यांच्या मर्जीतील जे ठेकेदार आहेत जे त्यांच्या तालावर इशाऱ्यावर नाचतात त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या लोकांनी संगमनेरला पोखरून खाण्याचं काम केलं आहे. ही संगमनेरला लागलेली कीड आपल्याला संपवायची आहे.

मतदारसंघातील सर्व प्रलंबित कामे आता नव्याने सुरू करायचे असून एकही काम अपुरं राहणार नाही असा विश्वास जनतेला देतो. या सर्व प्रलंबित असलेल्या कामांचा अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आढावा घेतला. ही सर्व कामे दर्जेदार करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
