जयहिंद कलामहोत्सवात 7200 विद्यार्थ्यांनी एका सुरात गायली देशभक्तीपर गीते
3 दिवसात 15 हजार विद्यार्थ्यांची भेट
संगमनेर दि. 24
जयहिंद लोकचळवळीचे प्रणेते माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कलागुणांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या वतीने आयोजित कला महोत्सवात तीन दिवसात 15000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर 7200 विद्यार्थ्यांनी एक तालात देशभक्तीपर गीते गायल्याने परिसर दुमदुमून दिला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने तीन दिवसीय कला महोत्सवाचे आयोजन झाले. यावेळी सांगता कार्यक्रम प्रसंगी झालेल्या सामूहिक गाण्याच्या वेळी संस्थापक डॉ. सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, बालभारतीचे अधिकारी डॉ. अजय कुमार लोळगे, प्रकल्प प्रमुख प्रकाश पारखे, डॉ.नामदेवराव गुंजाळ, शाहीर विकास भालेराव, अनंत शिंदे, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी क्रीडा संकुलाच्या हिरव्यागार मैदानावर विविध शाळांमधील 7200 विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतामध्ये सहभाग घेतला. एक सूर एक तालात बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. हे गीत विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठ्या उत्साहाने सादर केले. तर सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताने प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणले. टाळ्यांच्या निनादात सादर केलेले उधळीत शीतकीरणा, उजळीत जन हृदया या गीताने धमाल केली. जगी घुमवा रे, दुमदुमवा रे भारत गौरव गाण या गीतातील एक स्वरातील लयबद्धतेने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

यानंतर सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी मिळून केलेल्या झुंबा डान्सने धमाल आणली. यामध्ये माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही सहभाग घेतला.
डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, निरोगी व निकोप समाज निर्मितीसाठी जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून काम होत आहे. कला व क्रीडा हे गुण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक विद्यार्थ्याला कलागुणांची अधिक माहिती व्हावी याकरता या शिबिराचे आयोजन केले आहे. तीन दिवसांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून यामधून मिळालेले प्रशिक्षण नक्कीच विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे या पुढील काळातही यापेक्षाही मोठे कला महोत्सव घेतले जातील असे ते म्हणाले.

बालभारतीचे डॉ.अजय कुमार लोळगे म्हणाले की, या शिबिरात विविध प्रकारच्या 23 कलांचे प्रशिक्षण देण्यात आले. तीन दिवस सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेताना या महोत्सवाचा आनंद घेतला. हा महोत्सव प्रत्येकाच्या जीवनात मोठा ठेवा ठरणार असून शैक्षणिक अभ्यासाबरोबर उपक्रमशील अभ्यासक्रम देण्यासाठी जयहिंदचा हा कौतुकास्पद प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्राचार्य के. जी. खेमनर, चांगदेव खेमनर, विनोद राऊत, चेतन मुर्तडक, राजू पारखे बजरंग जेडगुले आदींसह जयहिंदचे विविध पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक व कला आणि क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

