मंत्री उदय सामंत यांनी कवी आनंद फांदी नाट्यगृहाला भेट द्यावी
आमदार सत्यजित तांबे यांची पत्राद्वारे मागणी
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून अद्यावत नाट्यगृह उभे
संगमनेर प्रतिनिधी —
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यामध्ये अत्यंत वैभवशाली व प्रशस्त इमारती उभ्या राहिल्या आहेत. या शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या व सांस्कृतिक विश्वात अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून उभे राहिले असून या नाट्यगृहाला मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भेट द्यावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे की, अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर हे केवळ व्यापार आणि शिक्षणाचे केंद्र नव्हे तर समृद्ध आणि सांस्कृतिक साहित्य परंपरेचे केंद्र ठरले आहे. उत्तर पेशवाईत विशेष गाजलेले थोर संत कवी अनंत फंदी यांचे संगमनेरात वास्तव्य राहिली आहे. “अनंत फंदी कवणांचा सागर” असा त्यांचा गौरव होनाजी बाळांनी केला आहे. त्यांचे फटके ,पदे, लावण्या आणि कटाव हे रसाळ प्रासादिक व उपदेश पर असून लुंडे गुंडे फिरसे तट्टू हा त्यांचा फटका आजही लोकप्रिय आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर नगर परिषदेतर्फे त्यांच्या नावाने एक भव्य व अत्याधुनिक कवी अनंत फंदी नाट्यगृह उभारण्यात आले आहे .या नाट्यगृहासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 3.5 कोटी रुपयांच्या निधीतून उभारणी केली आहे. त्यानंतर 2021 – 22 मध्ये नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत हे नाट्यगृह बंदिस्त स्वरूपात विकसित करण्यासाठी 7.99 कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे.

सध्या या नाट्यगृहाचे मुख्य बांधकाम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून आतील सुसज्जता, ध्वनी प्रणाली, आसन व्यवस्था व परिसराचे सौंदर्यीकरण याचे काम अंतिम टप्प्यात आले असून प्रलंबित आहे. नाट्यगृह पूर्णत्वास नेण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. हे नाट्यगृह पूर्ण झाल्यानंतर संगमनेरच्या वैभवात आणि मराठी सांस्कृतिक अभिमानात मोठी भर पडेल.
मराठी भाषा आणि कला विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहात. त्यामुळे उद्या (रविवार) संगमनेर दौऱ्यामध्ये आपण कवी अनंत फंदी नाट्यगृहाला भेट द्यावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.

