गणेश विसर्जनासाठी एकविरा फाउंडेशन चे 400 स्वयंसेवक मदत करणार !
संगमनेर प्रतिनिधी दिनांक –
संगमनेर शहर व तालुक्यात गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत असून अनंत चतुर्थीच्या दिवशी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वात दरवर्षीप्रमाणे एकविरा फाउंडेशन चे 400 युवक व युवती नागरिकांना गणेश विसर्जन करण्यासाठी मदत कार्यात सहभागी होणार आहेत.

अध्यक्षा डॉ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या वतीने मागील पाच वर्षापासून अनंत चतुर्दशीच्या दिवशी तालुक्यातील शेकडो युवक व युवती दिवसभर विसर्जन कामात नागरिकांना मदत करतात. याचबरोबर निर्मल्याचे संकलन करून परिसर स्वच्छ करतात. हा अभिनव उपक्रम संगमनेर करांसाठी आनंददायी असून यावर्षी सुद्धा एकविरा फाउंडेशनचे चारशे युवक व युवती निर्माल्य संकलन व गणेश विसर्जन कामात मदत करणार असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले आहे.

संगमनेर शहरात विविध गणेश मंडळांनी आदर्श देखाव्यांसह विद्युत रोषणाई केली आहे. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची शहरांमध्ये मोठी गर्दी होत आहे. मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा होत असून या काळात असणाऱ्या निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने तयारी करण्यात आली आहे याचबरोबर जाणता राजा मैदान येथे कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आला आहे. पर्यावरण पूरक व स्वच्छतेचा मंत्र देऊन काम करणाऱ्या एकवीराने नदीकाठी नागरिकांसाठी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. संगमनेर नगरपालिका व विविध स्वयंसेवी मंडळेही यामध्ये सहभागी होणार आहेत.

नदीला पाणी असल्याने नागरिकांनी गणेश विसर्जनासाठी जास्त खोल पाण्यामध्ये जाऊ नये पर्यावरण पूरक स्वच्छ आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करावा असे आव्हान डॉ. जयश्री थोरात यांनी केले असून गणेश विसर्जनासाठी आल्यानंतर सर्वांनी निर्मलाचे संकलन एकत्र करावे असे आवाहनही केले आहे. या दिवशी सुरक्षा पथकांसह, पोहणारे तरुण सज्ज असणार आहेत याचबरोबर नागरिकांना आनंदाने गणेशोत्सव मिरवणूक साजरी होईल यासाठी फाउंडेशनचे सर्व स्वयंसेवक मदत करणार आहेत.
तरी नागरिकांनी जाणता राजा मैदान येथील कृत्रिम तलाव व नदीकाठी गणेश विसर्जन करताना खोल पाण्यामध्ये न जाता काळजीपूर्वक गणेश विसर्जन करावे असे आवाहनही फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
