पोलिसांनी गांजा पकडला ; पण गुन्हा दाखल नाही
नगर जिल्ह्यातील बड्या अधिकाऱ्याचा हस्तक्षेप ?
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील अवैध उद्योग चव्हाट्यावर येत आहेत. अशा अवैध धंद्यां बरोबरच पोलिसांचे देखील उद्योग चर्चेत आले असून या सर्व प्रकारांमुळे संगमनेर शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांची रेलचेल सुरू असल्याची आणि अवैध धंदे चालकांची पोलिसांशी असलेली मैत्री उघड होत आहे.

पाच दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी सुमारे १५० ते २०० किलो गांजा पकडण्यात आला. हा गांजा पकडण्यात आल्यानंतर संबंधित आरोपींसह गांजा वाहतूक करणारे वाहन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसून पोलिसांनी हा प्रकार गुलदस्त्यात ठेवला असल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

संगमनेर तालुक्यात अमली पदार्थांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होते. गांजा, अफूची पावडर, एमडी पावडर, गोळ्या, इंजेक्शन याची रेलचेल असून संगमनेर आणि पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवर ओडीसा राज्यातून आणि पुणे जिल्ह्यातून येणारा अवैध माल, अमली पदार्थ अदलाबदल होत असतो. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी सुरू असते. या आधी देखील पठार भागातील काही मुलांवर गांजा तस्करीबाबत गुन्हे दाखल झालेले आहेत.

अशा पार्श्वभूमीवर पाच दिवसांपूर्वी घारगाव पोलिसांना एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गांजा तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा असून ही गांजा घेऊन जाणारी गाडी पकडली. या गाडीत गुन्हेगार असलेला आणि सध्या तुरुंगात असलेल्या एका आरोपीचे काही पंटर पोलिसांना सापडले असल्याची माहिती समजली असून त्यांच्याकडे १५० ते २०० किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गाडी पोलीस स्टेशनलाही नेली. परंतु दुसऱ्या दिवशी या गाडीवर किंवा संशयित आरोपींवर कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याचे आणि संबंधित आरोपींना देखील सोडून दिले असल्याची माहिती समजली असून पोलिसांच्या या भूमिकेबाबत पठार परिसरात आणि पोलिसांमध्ये कुजबुज सुरू आहे. त्यामुळे अशा उद्योगाची चर्चा सुरू झाल्याने पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे.

विशेष म्हणजे हा गांजा पकडल्यानंतर जिल्ह्यातील एका मोठ्या अधिकाऱ्याने घारगाव अधिकारी आणि पोलिसांशी संपर्क ठेवत काहीतरी काळबेरं केलं असल्याची देखील चर्चा ऐकण्यास मिळत असून या प्रकरणात त्या बड्या अधिकाऱ्याने सहभाग घेऊन हे प्रकरण दाबले असल्याचे देखील बोलले जात आहे.
