‘गोंधळ मिसळ’ मध्ये गोंधळ…
पोलिसांचा छापा… पोरा पोरींची झाली पळापळ..
प्रतिनिधी —
संगमनेर शहरात पडद्याआडचे कॅफे कल्चर वाढीला लागल्यापासून अनेक उद्योग घडले आहेत. अशा बेकायदेशीर कॅफेमधून अल्पवयीन मुलींसह युवतींवर देखील अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बेकायदेशीर कॅफे चालवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असले तरी संगमनेरात असे उद्योग सुरूच असल्याचे उघड होत आहे.

शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या गणेश नगर परिसरातील (अगदी रस्त्याच्या कडेला) ‘गोंधळ मिसळ’ या दुकानातील एका छुप्या कॅफेवर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला आणि त्या ठिकाणी पडद्याआड, लाकडी प्लायवूडच्या कंपार्टमेंट आडोशाला चाळे करत असलेल्या जोडप्यांची एकच तारांबळ उडाली आणि चांगलीच पळापळ झाली. पोलिसांनी या बनावट कॅफेत प्रवेश करताच काही पोरा पोरींनी तिथून धूम ठोकली. तर काही पोलिसांच्या हाती लागले.

पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांना अशा पद्धतीने बेकायदेशीर उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ यांच्यासह महिला पोलीस ताई शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी या गोंधळ मिसळ कॅफेमध्ये छापा घातला.

पोलिसांची चाहूल लागताच त्या ठिकाणी असलेल्या जोडप्यांमधील काही मुले आणि मुली पळून जाण्यात यशस्वी झाले. गोंधळ मिसळच्या वरच्या मजल्यावर प्लायवूडचा वापर करून वेगवेगळे कंपार्टमेंट करण्यात आलेले आढळून आले. त्यात काही मुले व मुली या अश्लील चाळे करत असताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कडक शब्दात तंबी दिली. या कंपार्टमेंटला गडद रंगाचे पडदे लावण्यात आलेले होते. आत मध्ये बसण्यासाठी टेबल ठेवलेले दिसून आले. कॉफी शॉप असले तरी त्याचा परवाना दिसून आला नाही. शिवाय कॉफी बनवण्याचे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. तेथे आढळून आलेल्या प्रेमी युगुलांना पोलिसांच्या भाषेत कायदेशीर समज देण्यात आली. इ साक्ष ॲप्लीकेशन द्वारे व्हिडिओ व फोटो घेण्यात आले आहेत.

कॅफेवर काम करणाऱ्या दौलत बन्सी खाडे (वय 42 वर्षे, राहणार रंगार गल्ली, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानाच्या मूळ मालकाला बोलावण्यात येऊन चौकशी करण्यात आल्याची माहिती समजली असून पोलिसांनी त्यांच्यावर काय कारवाई केली हे मात्र गुलदस्त्यात आहे.

दुधगंगा पतसंस्थेत झालेला ग़ैरव्यवहार कोणीच उघड़किस आनत नाहीये
शिवाय आता मुळ दोषी सापडला आहे
तरी देखील कुठलीही कार्यवाही नाही ना कुणाला पतसंस्थेतुन पैसे मिळत नाहीये
गोर गरीब जनतेने कष्टाचे पैसे ठेवलेले आहेत
आणि आता पैश्यांची गड़बड़ करून गुन्हेगार आणि पोलिस सगळे शांत बसलेत
कोणीही वाचा फोडायला पुढे येत नाही
पत्रकारांवर आणि मीडिया वर शेवटचा भरवसा होता
आता तो पण नकोसा वाटू राहिला
का कुणास ठाऊक पण सगळे पैसे खाऊन शंड बनून बसलेत