संगमनेरात नशिले पदार्थ आणि ड्रग्सचा धुमाकूळ !

गांजा, एमडी, नाईट्रो, टर्मीन, नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शनची तस्करी !

प्रतिनिधी —

काही महिन्यांपूर्वी संगमनेर शहरात अगदी मध्यवर्ती भागात पोलिसांना नशिला पदार्थ गर्द मिळून आला होता. पोलिसांनी गर्द पकडून कारवाई केली. मात्र स्थानिक पातळीवरच ही कारवाई संपुष्टात आली. या मागचे मोठमोठाले सूत्रधार मोकळेच राहिले. त्यानंतर आता संगमनेरात गेल्या काही महिन्यांपासून नशेच्या पदार्थांची रेलचेल सुरू झाली असून युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे या सर्व नशिल्या पदार्थांची मोठी तस्करी संगमनेरात होत असल्याचे बोलले जात आहे.

विकसित संगमनेर शहर आणि तालुक्यात विविध शिक्षण संस्थांमुळे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ड्रग तस्करी करणाऱ्या आणि नशेचा धंदा करणाऱ्या मंडळींना असे युवकांचे पॉकेट महत्त्वाचे ठिकाण असते. शहरातील विविध महाविद्यालयांच्या, शाळेतल्या, कॉलेजच्या मुलांना नशेच्या मायाजालात खेचणे सोपे असल्याने संगमनेर येथे नशील्या पदार्थांची जोरदार विक्री आणि उलाढाल सुरू असून ड्रग्स तस्करीने धुमाकूळ घातलेला आहे.

पुणे, नाशिक, श्रीरामपूर भागातून एमडी पावडर, अफू पावडर मोठ्या प्रमाणावर संगमनेर तालुक्यात पोहोचत आहे. ओडिशा राज्यातून गांजा आणि इतर महत्त्वाचे बंदी असलेले ड्रग्स मोठ्या प्रमाणावर तस्करी केले जात असून पहाटेच्या वेळी महामार्गालगत याची देवाण-घेवाण होते. ही देवाणघेवाण मुख्यतः तरुण युवकांना आणि विद्यार्थ्यांना हाताशी धरून केली जाते. विद्यार्थी मोटर सायकल वरून ये जा करत असल्याने आणि सर्व माल पाठीवरच्या दप्तरासाठी वापरल्या जाणाऱ्या सॅक मध्ये आणत असल्याने त्यांचा संशय येणे अवघड होऊन बसले आहे. विशेष म्हणजे पारंपरिक तस्कर आणि नशेच्या पदार्थांचे विक्री करणारे हिस्ट्रीशीटर गुन्हेगार यांचे छुपे लागेबांधे पोलिसांशी असले तरी नव्याने मात्र थेट विद्यार्थी आणि युवकच या धंद्यात उतरल्याने मोठी उलाढाल सुरू झाली आहे. पोलिसांचे या प्रकाराकडे सोयस्कर्लक्षरीत्या दुर्लक्ष होत आहे, की मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे हा एक संशोधनाचा विषय आहे.

संगमनेर हे मटका, जुगार अड्डे, गोवंश हत्या, कत्तलखाने, गुटखा अशा नावाजलेल्या अवैध व्यवसायांसाठी सुप्रसिद्ध तर आहेच. आता गांजा आणि नशील्या पदार्थांसाठी, ड्रग्स साठी देखील संगमनेर हे नगर जिल्ह्यातील मोठे केंद्र बनले आहे. एमडी पावडर, मॉली, एक्सटसी, एक्स, सुपरमॅन अशा वेगवेगळ्या पर्यायी आणि सांकेतिक नावांनी ओळखले जाणारे ड्रग्स मानवी जीवनावर मोठे परिणाम करतात. डिप्रेशन, आत्महत्याचे विचार, तणाव याचे प्रमाण वाढत चालले आहे. विद्यार्थ्यांना याची व्यसन जडले आहे. विशेष म्हणजे १० ते ३० हजार रुपये १ ग्रॅम एवढे महागडे हे पदार्थ असून देखील त्याची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे घेतल्यानंतर तोंडाचा वास येत नसल्याने आणि नशा केल्याचे ओळखू येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या कुटुंबातील लोकांना यातील गडबड समजून येत नाही. रात्रभर जागरण करून मुलगा जर अभ्यास करत असेल तर त्याची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे एवढे मात्र नक्की.

नाईट्रो गोळ्या या निद्रा नाश करून मेंदूला शांत करतात. नाईट्रोग्लिसरीनचा देखील वापर नशेसाठी केला जात असल्याचा माहिती समोर आली आहे. त्यामुळे या गोळ्या, एमडी पावडर आणि यावर सगळ्यात कहर म्हणजे टर्मिन नावाचे इंजेक्शन देखील मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. या टर्मिन इंजेक्शनचा वापर ऑपरेशनच्या वेळी रक्तदाबासाठी केला जात असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. याचा वापर नशा करण्यासाठी केला जात असल्याने हे सर्व प्रकार धोकादायक आहेत. संगमनेर याचे केंद्र बनले असून जुन्नर, ओडिसा सारख्या परिसरातून हा माल मोठ्या प्रमाणावर येतो.

या अवैध धंद्यात युवक आणि विद्यार्थी यांचा मोठा सहभाग असल्याने युवकांच्या राहणीमानावर त्याचा परिणाम झाला आहे. मुलांकडे अचानक पैसा, महागड्या गाड्या, सोन्याच्या साखळ्या, कपडे, घड्याळे, महागडे मोबाईल याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे क्राईम वाढला असून युवकांमध्ये भांडणे देखील वाढली आहेत. शहराच्या आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गावातून गांजाची विक्री देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. ग्रामीण भागात या नाशिल्या पदार्थांची ने आन करणे सोपे असल्याने संगमनेरात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. काही वर्षांपूर्वी पठार भागातील दोन तरुणांना अशाच ड्रग्स आणि नाशील्या पदार्थांच्या तस्करी आणि विक्री संदर्भात ओडिशा पोलिसांनी पकडून नेल्याची माहिती समजली आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!