संगमनेरचा मुळशी पॅटर्न 

तत्कालीन तहसीलदारांसह संपूर्ण महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात !

मौजे चिकणी येथील जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण आणि नोंदणी प्रकरण 

मन मानेल तशा नोंदी आणि कागदपत्रे….

प्रतिनिधी —

मुळशी पॅटर्न प्रमाणे संगमनेर – अकोले तालुक्यात सुरू असलेले शासनाच्या जमिनी लाटण्याचे उद्योग उघड होत आहेत. यामध्ये शेकडो एकर जमीन हडप करण्याचा प्रकार समोर आला असून अशा सर्व व्यवहारांमध्ये संगमनेर महसूल विभागासह जिल्ह्यातील महसूल खात्याच्या भोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण, नोंदणी करण्याच्या उद्योगात तत्कालीन तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी, मंडळ निरीक्षक, तलाठी सहभागी असल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत.

दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कुठलेही आदेश अथवा सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सूचना अथवा आदेश प्राप्त झाल्यास नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, असे संगमनेरचे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांनी सांगितले आहे.

संगमनेर तालुक्यातील चिकणी गावात झालेला मोठा जमीन गैरव्यवहार समोर आल्यानंतर संबंधित गैरव्यवहार करणाऱ्या मंडळींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारे जमिनीची अवैध खरेदी विक्री झालेली असल्याने अनेक प्रकरणे उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुळात शासनाच्या राखीव जमिनी, वनक्षेत्रातील राखीव जमिनी, कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील हरित पट्ट्यात असलेल्या राखीव जमिनी, भंडारदरा, मुतखेल कोलटेंभे, समशेरपुर, पाचपट्टा, बिताका, संगमनेर तालुक्यातील पठार भाग, कऱ्हे घाट, चंदनापुरी पुरी घाट शिवारातील वन जमिनी, आदिवासी जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार नियम बाह्य प्रमाणे होतातच कसे आणि त्याची नोंदणीही कशी काय होते ? याबाबत संगमनेर विभागातील सह दुय्यम निबंधक कार्यालय, महसूल विभागाची कार्यालये आणि संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, नोंदणी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनतेमधून होऊ लागली आहे.

विशेष म्हणजे संगमनेर अकोले तालुक्याच्या क्षेत्रफळा अंतर्गत ज्येष्ठ नेते माजीमंत्री मधुकर पिचड, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अश्या बड्या नेत्यांचा वरचष्मा असून त्यांच्याकडे महाराष्ट्र सरकारची वरिष्ठ पदे, मंत्री पदे असताना देखील अशा प्रकारचे गैरव्यवहार होणे म्हणजे नेमके पाणी कुठे मुरत आहे ? याचा देखील खुलासा होणे गरजेचे झाले आहे.

चिकणी येथील जमीन गैरव्यवहारा बाबत उपलब्ध झालेल्या कागदपत्रावरून नोंदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अनेक प्रकारची नियमबाह्य कामे केली असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे फेरफार वरच्या नोंदी या संशयास्पद असून या नोंदी करताना कुठल्याही पत्राचे संदर्भ न देता अर्धवट माहिती कोंबण्यात आलेली आहे. सगळ्याच फेरफार मध्ये आणि नोंदण्यांमध्ये नियमबाह्यतेचा आणि कायदे मोडीत काढून नोंदणी करण्याचा, अवैध प्रकारांचा प्रताप करून ठेवण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!