आजी – माजी सुभेदार मंत्री “एकाच माळेचे मणी” 

जमिनींची लूटमार करणारे दरोडेखोर आणि – आटपाट नगरीची कथा / व्यथा  

 

सेवानिवृत्तीचे वय नसताना आणि कार्यकाल संपलेला नसताना देखील अचानकपणे सेवानिवृत्त (रिटायर्ड) झालेले व आटपाट नगरीत आणि नगरीच्या परगण्यात सामान्य आणि सनदी अधिकारी म्हणून महसुली विभागात काम केलेल्या सर्वच संशयित अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे असून त्यातील काहीजण तर थेट आटपाट नगरीच्या सुभेदारांसाठी ‘सेटलमेंट आणि दलालीचे’ काम करीत असल्याचे रयतेला दिसत आहे.

 

आटपाट नगरीत, नगरीच्या राज्यात आणि देशात सध्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, सुभेदारांनी, मंत्र्यांनी, भक्तांनी आणि गुलामांनी सर्वक्षेत्रांत ‘क्रांती प्रतिक्रांती’ करण्याचा धुमधडाका लावला आहे.

त्यातलाच एक प्रकार म्हणून देशाच्या जमिनी हडपण्याचा आणि लाटण्याचा प्रकार सुरू असून अशा चोरलेल्या जमिनी उद्योगपतींच्या, आपल्या सहकाऱ्यांच्या, मित्रांच्या, नातेवाईकांच्या, चमच्यांच्या नावावर करून नंतर बळकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी तो यशस्वी झाला आहे. काही ठिकाणी तो यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.

सध्या आटपाट नगरीमध्ये आणि नगरीच्या परिसरात असलेल्या जमिनीवर डल्ला मारण्याचे काम आटपाट नगरीच्या आजी-माजी महसूली मंत्र्यांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी चालवले आहे. नगरीतील एका ‘माल’ असलेल्या बड्या उद्योगपती आणि त्याच्या बंधू भावांच्या छत्रछायेखाली असलेली ‘मुळशी पॅटर्न वाली एक टोळी’ कार्यरत आहे. आटपाट नगरीतील आणि राज्यातील शेतजमिनी, राखीव जमिनी, राखीव वनक्षेत्रातल्या जमिनी, आदिवासींच्या नावावर असलेल्या जमिनी, अभयारण्य आणि हरित पट्ट्यातील राखीव जमिनी अक्षरशः लुटण्याचा आणि त्या हडपण्याचा धंदा सुरु आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे गैरव्यवहार करून जमिनी हडपण्यासाठी आजी – माजी मंत्री असलेल्या सुभेदार यांचे लाभार्थी पुढे सरसावलेले आहेत. दोघेही एकमेकांकडे बोट दाखवून टीकेचा कागदी भडीमार करीत असले तरी घोटाळे करण्यात आणि जमिनी बळकवण्यात दोघेही ‘एकाच माळेचे मणी’ असल्याचे रयत बोलून दाखवते. दोघांचा इतिहास – भूगोल शोधला तर कित्येक जमिनींचे व्यवहार बाहेर येतील.

आटपाट नगरीच्या पूर्वेला असणाऱ्या एका सुभेदार मंत्र्याने नुकतीच आटपाट नगरीच्या राज्याची अनेक एकर जमीन एका बड्या उद्योगपतीच्या घशात घातल्याची खबर राज्यभर फिरत होती. ही जमीन उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी काही प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी देखील द्यावा लागला आहे. काही जमिनी बळकवण्यासाठी भ्रष्ट अधिकाऱ्यांचा वापर देखील केला जात असल्याचे दिसून येत आहे. आटपाट नगरीच्या राज्याच्या राजधानीतील हे प्रकरण गाजत असतानाच आटपाट नगरीत देखील जमीन चोरीचे घोटाळे वारंवार पुढे येत आहेत. आटपाट नगरीचे ‘तह हयात सुभेदार’ आणि सुसंस्कृत व संस्कृतीचे रक्षक म्हणून फेमस असलेल्या माजी मंत्र्यांच्या लाभार्थ्यांनी देखील नगरीच्या आणि नगरीच्या आसपास असलेल्या शासकीय, राखीव वन जमिनी, जंगले, आदिवासींच्या जमिनी लुटण्याचे आणि हडपण्याचे काम केले आहे.

या सर्व जमिनी शेकडो एकरांमध्ये आहेत. विविध ठिकाणी ‘भूखंडांचे श्रीखंड’ खाण्यात आजी – माजी सुभेदार मंत्र्यांचे बगलबच्चे आघाडीवर असले तरी त्यामध्ये त्यांच्या खात्याच्या आणि त्यांनी सांभाळलेल्या खात्याच्या विभागाचे आजी – माजी अधिकारी देखील सहभागी आहेत. यात शपथा घेऊन जबाबदारीच्या पदावर असलेले काही ‘सनदी अधिकारी’ देखील सामील आहेत. आटपाट नगरीच्या महसुली विभागात बदलून येण्यासाठी आणि बदलून आल्यानंतर अधिकारी जनतेच्या लुटलेल्या पैशाची उधळण करीत असतात. आटपाट नगरीत येऊन महसुली विभागाची विविध पदे व अधिकार वापरून आटपाट नगरीची लुटमार कशी करता येईल एवढा एकच उद्देश या अधिकाऱ्यांनी ठेवलेला दिसून येतो. सेवानिवृत्तीचे वय नसताना आणि कार्यकाल संपलेला नसताना देखील अचानकपणे सेवानिवृत्त (रिटायर्ड) झालेले. आटपाट नगरीत आणि नगरीच्या परगण्यात सामान्य आणि सनदी अधिकारी म्हणून महसुली विभागात काम केलेल्या सर्वच संशयित अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे असून त्यातील काहीजण तर थेट आटपाट नगरीच्या सुभेदारांसाठी ‘सेटलमेंट आणि दलालीचे’ काम करीत असल्याचे रयत पहाते.

आटपाट नगरितील शासनाच्या राखीव जमिनी, निर्वाणीकरण न झालेल्या जमिनी, शर्ती अटीच्या जमिनी, कुठलेही व्यवहार व नोंदी न होणाऱ्या जमिनी, आदलाबदली करण्यास बंदी असलेल्या अश्या शेकडो एकर क्षेत्रात असलेल्या जमिनीवर डोळा ठेवून त्या आटपाट नगर येथे मुळशी पॅटर्न राबवणाऱ्या उद्योगपती त्यांचे बगलबच्चे, लँड डेव्हलपर्स, विकासक, कॉन्ट्रॅक्टर्स, गौण खनिज, दगड मातीचे वाटोळे करणारे, पर्यावरणाचे वाटोळे करणारे तस्कर या सर्वांच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. यामध्ये अधिकाऱ्यांचा वाटाही ठरलेला आहे. यामधून मिळणारा सर्व मलिदा, वाटा हा ‘एकाच माळेचे मणी’ असलेल्या दोन्ही सुभेदार आजी-माजी मंत्र्यांकडे देखील जात असतो. राज्य घटना, देशप्रेम, देशद्रोह यावर गप्पा म्हणजे फक्त बोलबच्चन आहे.

एकमेकांची जिरवण्यासाठी एकमेकांचे उद्योग बाहेर काढायचे, आपापल्या कार्यकर्त्यांना, लाभार्थ्यांना कार्यक्रमाला लावायचे. बेअक्कल कार्यकर्ते, नेते, गाव पुढारी एकाच माळेचे मणी असणाऱ्या दोघा सुभेदार आजी-माजी मंत्र्यांचा, नातेवाईकांचा मागील राजकीय इतिहास – भूगोल न तपासता मेंढ्यांसारखे त्यांच्या मागे फरफटत जात, उदो उदो करत आहेत. अर्थात त्यांना देखील त्यात वाटा मिळत असून त्यांची देखील अचानक श्रीमंती वाढलेली आहे. असे अचानक श्रीमंत झालेले आणि भली मोठी इस्टेट कमावलेले बरेच लाभार्थी आटपाट नगरीत आढळून येतील. अशा मंडळींच्या मागे आटपाट नगरीतली ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स वगैरे वगैरे विभागाची कर्तव्यदक्ष मंडळी कारवाई करण्यासाठी मागे लागलेली दिसत नाही.

अर्थात आटपाट नगरीत ‘लुटूपुटू’ च्या लढाईत आजी – माजी आणि ‘एकाच माळेचे मणी’ सुभेदार मंत्री असलेल्यांचा व लाभार्थ्यांचा क्रांती प्रतिक्रांतीचा खेळ सुरूच आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!