डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती स्मारकाबाबद प्रस्थापित आणि सर्वपक्षीय नेत्यांची अनास्था खेदजनक — प्रा. शशिकांत माघाडे
शासनाला एका मोठया उग्र आंदोलनाची अपेक्षा आहे काय ?
सर्वच लोकप्रतिनिधी बाबत व्यक्त केली तीव्र नाराजी
प्रतिनिधी —
छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक आज ना उद्या होईल यात शंका नाही. संगमनेरच्या वैभवात भर पाडणारे हे स्मारक ठरेल. मात्र शासकीय पातळीवरच्या हालचाली बघता डॉ.आंबेडकरांच्या स्मारकाबाबद प्रचंड उदासीनता दिसून येते असे खेदाने म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे प्रा. शशिकांत महागडे यांनी दिली आहे.

संगमनेर शहर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा स्मारक करण्यास सरकारने मान्यता दिल्याचे वृत्तपत्रातून आजी-माजी महसूल मंत्र्यांच्या समर्थकांची पत्रक बाजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

वृत्तपत्रांना पाठवलेल्या आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नुकतेच संगमनेरच्या स्थानिक वृत्तपत्रात बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबद वृत्त प्रसिद्ध झाले आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री यांनी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून १ कोटी रुपये मंजूर केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी वृत्तपत्रांना माहिती दिल्याचे प्रसिद्ध झाले आहे. याबरोबरच छत्रपती शिवरांयाच्या स्मारकासाठी एसटी महामंडळाच्या जागेला माननीय मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचे या बातमीत म्हटले आहे.

याचे सर्व श्रेय संबंधितांनी माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. स्मारकाची संकल्पना हीच मुळात माननीय पालकमंत्र्यांची आहे तेव्हा इतरांनी श्रेय घेऊ नये असेही पालक मंत्र्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी देखील या पूर्णाकृती स्मारकाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर प्रयत्न केल्याचा खुलासा केला आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षीय लोकप्रतिनिधींच्या समर्थकांनी परस्पर विरोधी दावे केले आहेत. एका वृत्तपत्राने आमदार सत्यजित तांबे यांचा हवाला देऊन असे वृत्त दिले आहे की, छत्रपती शिवरायांच्या स्मारकासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील स्मारक होणार आहे.

छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक आज ना उद्या होईल यात शंका नाही. संगमनेरच्या वैभवात भर पाडणारे हे स्मारक ठरेल. मात्र शासकीय पातळीवरच्या हालचाली बघता डॉ.आंबेडकरांच्या स्मारकाबाबद प्रचंड उदासीनता दिसून येते असे खेदाने म्हणावे लागेल. ६ डिसेंबर २०२३ रोजी खुद्द पालकमंत्री संगमनेरला आले आणि डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्या आंदोलनस्थळी भेट देऊन आंबेडकरांचे स्मारक सुद्धा निश्चित होईल असे आश्वासन दिले आणि डॉ.आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागा शोधण्याचे स्थानिक संबधितांना आदेश दिले. मात्र सहा महिने उलटून गेले तरी शासकीय पातळीवर काडीमात्र हालचाली झाल्याचे दिसून येत नाही.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत ९३२.३९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. विशेष आनंदाची बाब म्हणजे या आराखड्यात संगमनेर येथे लोकशाहीर विठ्ठल उमप आणि शाहीर अनंत फंदी यांचे स्मारकासाठी निधी मंजूर केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र डॉ.आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकप्रतिनिधींना वावडे आहे काय अशी शंका घ्यायला वाव आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्मारकाचा विषय प्राधान्याने का आणला गेला नाही ? राज्य पातळीवर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी डॉ. आंबेडकरांचे स्मारकाबद्दल काही पत्रव्यवहार किंवा पाठपुरावा केल्याचे दिसून येत नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे काही लोकप्रतिधींनी या विषयावर सोयीस्कर मौन धारण केले आहे.

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आमदार सत्यजित तांबे व्यक्तिशः भेट घेऊन विचारले असता डॉ. आंबेडकर स्मारक नक्की होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. एवढाच काय तो दिलासा ! सर्व नेते मंडळी खूप आस्थेवाईकपणे स्मारकाचे आश्वासन देतात मात्र शासकीय स्तरावर धोरणात्मक पातळीवर नेमके काय चालले आहे याचा थांगपत्ता लागत नाही. शासनाला एका मोठया उग्र आंदोलनाची अपेक्षा आहे काय ? संगमनेरातल्या सर्व पक्षीय नेते मंडळींनी देखील डॉ आंबेडकरांचे स्मारकाबद्दल गुळणी धरली आहे. राजकीय सभेत उठसुठ बाबासाहेबांचे नाव घ्यायचे. निवडणुका लढवायच्या आणि स्मारकाचा विषय निघाला की तोंड फिरवायचे असा खेदजनक अनुभव गेले वर्षभर सर्व कार्यकर्ते घेत आहेत. बाबासाहेब संगमनेरला भेट देऊन गेल्याचे अनेक जुनेजाणते लोक सांगतात तसे लेखी तपशील ही प्रसिद्ध आहेत. स्मारकाच्या आस्थेचा विषय एका जातीचा, समुदायाचा बनू नये ही अपेक्षा. तो सगळ्या संगमनेरकरांच्या आस्थेचा विषय बनावा.
