संगमनेरच्या मटका किंग आणि पोलिसांचे जुळले !

पोलीस निरीक्षकांपासून ते थेट पोलीस अधीक्षकांपर्यंत.. “हमाम में सब…

एलसीबीच्या मध्यस्थीने सब कुछ….

प्रतिनिधी —

दररोज सुमारे 12 लाख रुपयांचा टर्नओव्हर असणाऱ्या संगमनेर शहर आणि तालुक्यातील मटका किंग आणि पोलिसांचा व्यवहार ठरला असून पोलीस निरीक्षक ते पोलीस अधीक्षकांपर्यंत ” हमाम में सब…. असल्याचे उघड झाले आहे. नगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची वेळोवेळी तक्रार करूनही कुठलीही दखल घेतली जात नसल्याने पोलीस आणि मटका किंग मंडळींची ‘मिलीभगत’ चव्हाट्यावर आली आहे. आता हा धंदा मटका किंग ऐवजी पोलिसांनीच पार्टनरशिप मध्ये करायला हवा अशी टीका जनतेमधून होऊ लागली आहे. पोलिसांचे मटका किंग मंडळींशी लागेबांधे असल्याचे उघड करण्यासाठी संगमनेर शहरापासून ते थेट विशेष पोलीस महानिरीक्षकांपर्यंत अधिकृत तक्रारी करण्यात आल्या मात्र याची कुठलीही दखल घेतली गेली नसल्याने हे गुपित उघड झाले आहे.

मागील महिन्यात सातत्याने संगमनेरच्या मटका अड्ड्यावर छापे घालणारे एलसीबीचे पथक ,संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे अचानक शांत झाले आहेत. पंधरा वेळा छापे घालून दोन मटका किंगला  सलग आरोपी केल्यानंतर आता अचानक ‘शांतता मटका चालू आहे’ असा प्रकार दिसतोय.

एवढेच नव्हे तर पोलीस खात्या अंतर्गत आणि पोलिसांविषयी असलेल्या सामाजिक तक्रारी आणि फौजदारी स्वरूपांच्या तक्रारीबाबत देखील माहिती घेतली असता यामध्ये थेट संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्याला अर्ध्या ते एक तासात फोन करून कळविले जात असल्याचे देखील उघडकीस आले आहे. दुकानदारी साठी आणि एकमेकांना सावरून घेण्यासाठी एक साखळीच सुरू असल्याचे यातून समोर आले आहे. फक्त संगमनेरच नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अवैध धंदे चालक आणि पोलिसांचे साटेलोटे असल्याचे उघड झाले आहे.

बस स्थानकावरील सोनं साखळ्यांची चोरी, पाकीट मारी, रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची गंठण चोरी या सर्व चोऱ्यांबाबत संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या चोऱ्या सातत्याने होत आहेत. यातही कुठल्या प्रकारचा खंड पडलेला नाही. चोऱ्या करण्याची पद्धत सारखीच आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक बस स्थानकावर होणाऱ्या या चोऱ्यांमध्ये देखील साम्य दिसून येते. शिवाय या सर्व चोऱ्यांच्या तपासात शिथिलता असल्याचे आढळून येते. पोलीस तपासात आधुनिकता आणली गेली असली तरी नगर जिल्हा पोलीस मात्र गुन्ह्यांचा तपास लावण्याचा बाबतीत मागे पडले आहेत. फक्त कागदी घोडे नाचवणे एवढे एकच काम या ठिकाणी चालू आहे.

संगमनेर शहरासह तालुक्यातील घारगाव, आश्वी आणि संगमनेर तालुका पोलीस ठाण्या बरोबरच अकोले, राजुर आदी महत्त्वाच्या ठिकाणांवरून हा अवैध धंदा करणाऱ्यांनी पथकाच्या माध्यमातून संधान साधत आपला जम बसवला आहे. कोपरगाव मध्ये देखील प्रशासनाच्या बैठकीत अवैध व्यवसायिक आणि पोलिसांचे लागेबांधे असल्याचे पितळ उघडे पडले आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यात अवैध धंद्याला खतपाणी घालणारे हे तथाकथित ‘पथक’च कसे अवैधकाम करते, यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या, नेमणुका, अधिकाऱ्यांची कार्यपद्धती, ‘पोलीस मॅन्युअल’ला धाब्यावर बसवत नियमबाह्यपणे सुरू असलेले काम हे सर्वच उद्योग उघड होणार असल्याची माहिती समजली आहे.

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांपासून थेट जिल्हा पातळीवरील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यांची विविध पथके यांच्या हप्त्यांच्या रकमा सातत्याने वाढत असल्यामुळे मटका धंदा परवडत नसल्याचे कारण पुढे करीत संगमनेरातील दोन मटका किंगने सुमारे महिनाभर मटका बंद केला होता. पोलिसांच्या वाढत्या हप्ते मागणीमुळे आम्ही मटका धंदा बंद करत आहोत अशी आवई उठविण्यात येऊन तशी चर्चा देखील मटका किंग मंडळींनी घडवून आणली होती. त्यानंतर छुप्या पद्धतीने मटका सुरू होता. चवताळलेल्या पोलिसांनी विशेषत: नगर एलसीबीच्या पथकाने छापे मारण्यास सुरुवात करून थेट मटका किंग मंडळींनाच आरोपी करण्याचा सपाटा लावला. शहर पोलिसांनी देखील त्याची री ओढत कारवाया सुरू केल्या. आणि त्यानंतर सेटलमेंट झाल्यावर मटका किंग आणि पोलिसांनी ठरवून पुन्हा संगमनेरला मटका जोरदारपणे सुरू केला आहे. त्यानंतर या अवैध मटक्या बाबत तक्रारी करण्यात आल्या. त्याची कुठलीही दखल पोलिसांकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे यातून हे चित्र स्पष्ट होत आहे की, पोलीस आणि मटका किंग यांची मिलीभगत असून नगर जिल्ह्यातील एलसीबीच्या मध्यस्थीने कोणताही अवैध धंदा सुरू करता येतो अशी चर्चा आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!