छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे स्वप्न रंजन !
आजी – माजी महसूल मंत्र्यांच्या समर्थकांची श्रेय वादासाठी कागदी घोड्यांची लढाई सुरू !
प्रतिनिधी —
संगमनेर शहर बसस्थानकासमोर पुर्नाकृती पुतळ्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक होणार असून भविष्यात होणाऱ्या या स्मारकाला एक कोटी रुपयांचा निधी मंजूर आणि राज्य सरकारने या स्मारकाला मंजुरी दिली असल्याची श्रेय वादाची लढाई माध्यमांमधून माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांची सुरू झाली आहे. त्यासाठी कागदी घोडे माध्यमांच्या मैदानावर उतरविण्यात आले आहेत. मात्र अद्याप पर्यंत दोन्हीही सैन्याकडून मंजुरीची आणि निधीची अधिकृत कागदपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत.

संगमनेर शहरात बस स्थानका समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखणे स्मारक असावे अशी तमाम संगमनेरकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीला मूर्त स्वरूप येण्याची शक्यता दिसत असली तरी त्याला किती कालावधी लागेल हे मात्र सांगता येत नाही. बस स्थानकासमोरच स्मारक असावे यासाठी संगमनेरचे सत्ताधारी आणि त्यांचे विरोधक या दोघांनीही एकमेकांवर टीका करत लढाई देखील सुरू केली आहे.

यासाठी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विशेष, खास प्रयत्न केला असून सातत्याने पाठपुरावा करीत हे स्मारक बसस्थानकासमोरच करण्यासाठी राज्य शासनाला भाग पाडले असल्याचा दावा थोरात – तांबे यांचे समर्थक करतात. तर दुसरीकडे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक हे स्मारक करण्यासाठी, निधी मिळवून देण्यासाठी आणि ते बसस्थानकासमोरच करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न केले असून निधी आणि मान्यता त्यांच्यामुळेच मिळाली असल्याचा दावा विखे यांचे समर्थक कार्यकर्ते करीत आहेत. दोन्हीकडून माध्यमांद्वारे जोरदार दावा केला जात असला तरी याबाबतची अधिकृत कागदपत्रे मात्र सादर केली जात नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील भव्य स्मारक असावे अशी मागणी आंबेडकर प्रेमी मंडळींनी केली आहे. त्यासाठी विविध निवेदने विखे – थोरात यांना देण्यात आलेली आहेत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील स्मारक लवकरात लवकर उभे राहील अशी अपेक्षा संगमनेरकरांची आहे. भविष्यात होणाऱ्या या दोन्ही स्मारकांविषयी गेल्या अनेक वर्षांपासून विखे – थोरात समर्थक कार्यकर्त्यांची श्रेयवादाची लढाई मात्र सुरू आहे.
