अखेर संगमनेरात मटका अड्डे धूम धडाक्यात सुरू !
मटका किंग आणि हप्त्यांचे सूत्र जुळले…
नगर जिल्ह्यात अवैध धंद्यांचा धुमाकूळ
विशेष पोलीस महानिरीक्षकांनी लक्ष घालण्याची गरज
प्रतिनिधी —
नगर जिल्ह्यातील पोलीस, अधिकारी, पोलिसांची पथके यांच्या सततची हप्तेखोरी वाढत्या मागण्यांमुळे संगमनेर शहरातले आणि तालुक्यातले मटका अड्डे बंद करण्यात आले असल्याची चर्चा मटका अड्डा चालवणाऱ्यांकडून घडविण्यात आली होती. मात्र छुप्या पद्धतीने आणि मोबाईल ॲप द्वारे साधारण महिनाभर मटका सुरू ठेवल्यानंतर दोन दिवसांपासून नव्या जोमाने धुमधडाक्यात संगमनेर शहर आणि तालुक्यात सुमारे ७० ठिकाणी मटक्याच्या पेढ्या आणि अड्डे सुरू झाले आहेत. पोलीस आणि संगमनेरातल्या दोन मटका किंग मध्ये पुन्हा जुळवा जुळव, वाटाघाटी, मांडवली, तह झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन महिने मटका अड्डा चालवणाऱ्या तिसऱ्या मटका किंगला मात्र दूर करण्यात आले आहे.

साधारण महिना भरापूर्वी जिल्ह्यात कुप्रसिद्ध आणि एक नंबरचा अवैध धंदा असणाऱ्या संगमनेरच्या काही मटका चालकांकडून पोलीस आणि पोलीस पथकांच्या होणाऱ्या त्रासामुळे आणि सतत हप्ते वाढवून मागण्याच्या जाचा मुळे आम्ही मटका धंदा बंद करत आहोत अशी हवा करण्यात आली होती. मटका बंद केला आहे असे दाखवण्यासाठी काही दिवस मटका पेढ्या आणि टपऱ्या बंद करण्यात आल्या. मात्र छुप्या पद्धतीने मटका घेणे देणे चालूच होते. त्यामुळे पोलिसांनी देखील मागच्या महिन्याच्या काळात अनेक वेळा संगमनेरात छापेमारी करून शहरातील दोन मटका किंग वर थेट कारवाई केली आणि त्यांना आरोपी केले. हे छापे सातत्याने सुरू होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात मटक्यावर छापे याआधी झाले नाहीत. महिनाभर हा लपाछपीचा खेळ सुरू होता. परंतु आता सर्व सेटलमेंट झाल्यानंतर मटका पेढ्या पुन्हा सुरू झाल्या आहेत.

गेल्या महिन्याभरात अचानकपणे नगरच्या एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) यांनी संगमनेर शहरात छापे टाकून मटका टपऱ्या चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये मटक्याचे मूळ मालक म्हणून अशरफ जहागीरदार आणि शंकर इटप यांना देखील आरोपी करण्यात आले. अनेक वेळा पंटर पकडून कारवाई केली जात होती. परंतु अचानक मूळ मालकांना आरोपी करायला सुरुवात झाल्याने ‘कुछ तो गडबड है’ अशी चर्चा शहरात सुरू झाली. त्याचबरोबर संगमनेर शहर पोलिसांनी देखील असे छापे टाकण्यास सुरुवात केली आणि गुन्हे दाखल केले मागच्या एक महिन्याचे सर्व रेकॉर्ड तपासले असता सर्वकाही समोर येईल. विशेष म्हणजे शरद द्वारका शर्मा या तिसऱ्या मटका किंग वर देखील कारवाई करण्यात आली होती. परंतु दोन दिवसापासून सर्व काही आलबेल असून मटका अड्डे पुन्हा सुरू झाले आहेत.

मटक्याबरोबरच बिंगो, कॉइन बॉक्स, लोटो, ऑनलाइन मटका यासारखे जुगाराचे वेगवेगळे प्रकार सुद्धा नगर जिल्ह्यात सुरू आहेत. कोपरगाव, श्रीरामपूर भागात याचा जोर आहे कर्जत जमखेड परिसरात मटका, बिंगो यासह इतर अवैध धंद्यांना ऊत आला आहे. श्रीगोंदा तालुक्यात वाळू तस्करी वाढली आहे. दारूबंदी असतानाही राजुर परिसरात दारु राजरोसपणे उपलब्ध आहे. भंडारदरा या निसर्ग पर्यटन स्थळी अवैध दारू विक्रीचा जोर सुरू आहे. एकंदरीत पाहता संपूर्ण नगर जिल्ह्यातच अवैध धंद्यांचा धुमाकूळ सुरू आहे. नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी यात लक्ष घालून यास आळा घालावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नगर पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष !
संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंद्याचे मुख्य केंद्र म्हणून चर्चेत असलेल्या संगमनेर कडे पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. संगमनेर मध्ये मटक्याबरोबरच, गांजा तस्करी, जुगार अड्डे, अवैध कॅफे हाऊस, गुटखा तस्करी, वाळू तस्करी, गोवंश मांस तस्करी, गावठी कट्टे आणि त्याचबरोबर मंगळसूत्र, गंठण चोरांचे वाढते प्रमाण या सर्व बाबींकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. उत्तर नगर जिल्ह्यात संगमनेर असल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांची देखील पथके संगमनेर सह उप विभागात नेहमी फिरतीवर असतात. तरीही अवैध धंद्यांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही, असे एकंदरीत पोलीस रेकॉर्ड वरूनच दिसून येते. या सर्व बाबींची चौकशी पोलीस अधीक्षकांनी एकदा करायला हवी आणि नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी देखील यात लक्ष घालायला हवे अश्या प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

पोलीस, अधिकारी आणि पोलिसांच्या पथकाविरुद्ध महिनाभरापूर्वी गळे काढणाऱ्या मटका किंग मंडळींनी पुन्हा एकदा जोमाने संगमनेरात मटका अड्डे सुरू केले आहेत. नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे अचानक हे धंदे जोमात सुरू झाले आहेत ? ‘गोलमाल है भाई, सब गोलमाल है, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता पोलीस पथके, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक कारवाई करतात की नाही यावरून लवकरच सत्य समोर येईल. त्याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
