संगमनेर दुधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण !
240 कोटींचे नेमके कनेक्शन काय ?
आरोपींना मिळणार होते लाखोंचे कमिशन
सभासद नसलेल्या चेतन नागराज बाबा कपाटेउर्फ सुदर्शन महाराजच्या ट्रस्टसाठी करोडो रुपये..
पतसंस्थेच्या स्थापनेपासून भ्रष्टाचार — सुधाकर गुंजाळ
प्रतिनिधी —
दूधगंगा पतसंस्थेत 81 कोटी रुपयांचा घोटाळा करणारा मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि त्याचे उद्योग चर्चेत असतानाच आता छत्रपती संभाजी नगरच्या चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज याच्या श्रीकृष्ण आश्रम ट्रस्टला ट्रस्टला 240 कोटी रुपये देणगी देण्याचा उद्योग आरोपींनी सुरू केला होता अशी माहिती समोर आली असून आर्थिक गुन्हे शाखा नगर यांच्याकडून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. दरम्यान जामीन फेटाळल्यामुळे आरोपी चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज हा अनेक महिन्यांपासून पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या चेतन नागराज बाबा कपाटे याचे राज्यातील आणि देशातील राजकीय मोठ्या नेत्यांशी, पुढाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच थेट पंतप्रधानांपर्यंत त्याने विविध कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे. शिवाय भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीचे काम देखील तो पाहतो. एवढ्या राजकीय मैत्रीपूर्ण संबंधांमुळे चेतन नागराजबाबा कपाटे याला पोलीस अटक करत नाहीत असे बोलले जात आहे.

सर्वसामान्य जनतेच्या ठेवींवर अक्षरशः दरोडा घालून त्यांच्या 81 कोटीच्या ठेवी लंपास करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या आरोपींनी पतसंस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे आर्थिक गुन्हे करण्याचा सपाटा लावला असल्याचे चित्र समोर आल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही आरोपींना जामीन मिळाला आहे. तर काही आरोपींना जामीन न मिळाल्यामुळे ते पसार आहेत. तर काही तुरुंगात आहेत. मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचाराच्या नावाखाली आराम करत आहे.

यातील आरोपी चेतन नागराज बाबा कपाटे हा दूधगंगा पतसंस्थेचा सभासद अगर खातेदार नसताना देखील पतसंस्थेमधून आरोपींनी त्याच्या खात्यावर व्यवहार केले आहेत आणि काही रक्कमा देखील स्वीकारल्याही आहेत. या रक्कमा लाखो रुपयांमध्ये आहेत. कपाटे उर्फ सुदर्शन महाराज याच्या नावाने आरोपींनी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 9345 या नंबरचे बचत खाते उघडलेले आहे. सदरचे खाते उघडण्यासाठी संबंधित कपाटे याचा अर्ज किंवा केवायसी ची कागदपत्रे घेण्यात आलेली नाहीत. तसेच खाते उघडून त्यावरील व्यवहार खातेदाराच्या सही शिवाय केलेले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे लाखो रुपयांचे व्यवहार आरोपींनी संगनमताने केले आहेत की नाहीत आणि ते कोणासाठी केले आहेत, त्याचा लाभ कोणाला मिळाला आणि मिळणार होता याचा देखील तपास सुरू आहे.

दूधगंगा पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपींनी चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज याच्या श्रीकृष्ण आश्रम ट्रस्टला 240 कोटी रुपयांची देणगी मिळवून देण्याकरता नोटरी करारनामा केलेला असल्याचे देखील उघड झाले आहे. त्या पोटी काही मोठ्या रकमांचे चेक देण्यात आलेले आहेत. हे चेक संबंधित आरोपींना कोट्यावधी रुपयांच्या देणगीच्या बदल्यात कमिशन म्हणून दिले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये लाखो रुपयांचे व्यवहार आरोपींमध्ये झाले असून बँकांमधून एकमेकांच्या नावावर पैसे ट्रान्सफर झाले आहेत.

त्यामुळे आता या 240 कोटी रुपयांच्या देणगी व्यवहाराबाबतचे रहस्य नेमके काय ? हा पैसा कोणत्या मार्गाने आणि कुठून येणार होता ? तसेच करोडो रुपये कोणाच्या खात्यावर जाणार होते ? त्याचे कमिशन कोणाला मिळणार होते ? त्यातील काही लाख रुपयांची रक्कम कोणाला मिळाली आहे ? यामध्ये आरोपींचा कसा कसा सहभाग होता ? हा पैसा युएसए, कॅनडा येथूनही येणार असल्याचे चर्चा आहे. याचा तपास पोलीस करत असून चेतन नागराज कपाटे या आरोपीच्या मागावर देखील पोलीस आहेत.

पतसंस्थेच्या स्थापनेपासून सुरू होता भ्रष्टाचार !
दुधगंगा पतसंस्थेत स्थापनेपासून भ्रष्टाचार सुरू होता. सुरवातीला बाळासाहेब पवार सरांना व्हाइस चेअरमन केले. नंतर भाऊसाहेब कुटे यांना त्यांची अडचण वाटल्याने त्यांना पुढील संचालक मंडळात स्थान दिले नाही. २०००-२००१ साली मोठा घोटाळा उघडकीस आला. ठेवीदारांना ठेवीची मुद्दल रक्कम देऊन संपूर्ण व्याजाची रक्कम हडप करण्यात आली. वैयक्तिक मालमत्ता समजून मनमानी केली. वैयक्तिक खर्च, संस्थेची जागा खरेदी, बांधकाम, कर्जवाटप, कर्जवसुली रक्कम खात्यावर जमा न करणे, ठेवीदारांची लुबाडणूक, अनामत रक्कम हडप करणे, ठेवीच्या पावत्या हडप करणे, गाय विमा न काढता पैसे हडप करणे, स्टॅंपड्युटीच्या नावाखाली स्पेशल अनामत रक्कम कापून हडप करणे…. असा खूप मोठा घोटाळा केला आहे… ८१ कोटी रुपये हे हिमनगाचे टोक आहे…. प्रचंड, प्रचंड मोठा महाघोटाळा केला आहे….. सुधाकर गुंजाळ, संगमनेर
