दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण !
आरोपी भाऊसाहेब कुटे सिव्हिल रुग्णालयात करतोय आराम !
त्यांच्या तोंडावर फोड आलाय — सिव्हिल सर्जन डॉ. संजय घोगरे यांची माहिती
ठेवीदार आक्रमक, चौकशीची मागणी
प्रतिनिधी —
संगमनेरच्या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या दुधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा फक्त एका तपासणीच्या नावाखाली गेल्या सात दिवसांपासून ‘नगर सिव्हिल हॉस्पिटलचा पाहुणचार’ घेत असल्याचे समोर आले असून तुरूंगापासून दुर रहाण्यासाठी संगनमताने ही शक्कल लढवली गेली असल्याचा आरोप पिडित ठेवीदार, सभासदांमधून केला जात आहे.

८१ कोटी रुपयांचा घोटाळा करून मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन ते चार महिने फरार झाला होता. कनिष्ठ स्तर न्यायालयापासून ते थेट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केल्यानंतर थकून तो पोलिसांच्या स्वाधीन झाला होता. काही दिवसांपासून तो न्यायालयीन कोठडीत संगमनेरच्या कारागृहात होता. मात्र अचानकपणे आरोपीला संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन तेथून दोन ते चार दिवसांनी लगेच नगर येथे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले.

आरोपीला कोणता आजार झाला आहे ? कशासाठी आरोपीला नगरला हलविण्यात आले आहे ? याबाबतची माहिती देण्यास सुरुवातीला नेहमीप्रमाणे टाळाटाळ करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपीला नगर येथे पाठवण्या इतके मोठे कारणही नव्हते असे आता बोलले जात आहे. त्यामुळे कुटेवर गेल्या सात दिवसांपासून नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमका कोणता उपचार चालू आहे हे लपविण्यात आले आहे. अगदी किरकोळ तपासण्या करण्यासाठी नगर तेथून पुढे त्याला पुणे येथे पाठवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा ठेवीदारांमध्ये सुरू असून ठेवीदारांचा सुद्धा या संदर्भात गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांकडेही फोन करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

विशेष म्हणजे सात दिवसापासून आरोपी हा उपचारासाठी आला असून सिव्हिल सर्जन डॉ. संजय घोगरे यांना याची माहिती सुद्धा नव्हती असे त्यांचे म्हणणे आहे. संपर्क करूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे साशंकता निर्माण झाली आहे. तुरुंगात रहाण्या ऐवजी आजाराचे कारण करून हॉस्पिटलमध्ये जामीन मिळेपर्यंत ‘आरामात दिवस काढण्याचा प्लॅन’ आरोपीचा असून वैद्यकीय प्रशासन आणि महसूल प्रशासन या दोघांकडूनही संगणमताने आरोपीला मदत केली जात असल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत.

आरोपी कुटेच्या तोंडावर फोड आला आहे….
या संदर्भात नगर जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. संजय घोगरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यासंदर्भात माझ्याकडे माहिती नाही माहिती घेऊन आपणास कळवतो असे सांगितले. मात्र संध्याकाळपर्यंत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. सायंकाळी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की मी दिवसभर जिल्हाधिकाऱ्यांकडे होतो. असे सांगत पुन्हा टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर त्यांनी फोनवरून सदर आरोपीच्या चेहऱ्यावर फोड आल्याने त्याच्यावर फिजिशियन आणि सर्जन कडून उपचार करायचा आहे असे सांगत आरोपीचे चेहऱ्याचे छायाचित्र दाखविण्यास नकार दिला आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती देता येणार नाही असेही वरून सांगितले मात्र संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयातून दिलेल्या मेमोवर सिव्हिल सर्जन यांनी सांगितल्या प्रमाणे कुठलाही उल्लेख आढळला नाही.

ठेवीदार आक्रमक – चौकशीची मागणी..
आमच्या आयुष्यभराच्या कमाईचे वाटोळे करून पैसा आणि राजकीय सत्तेचा वापर करीत मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा संगमनेर येथील वैद्यकीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगणमत करून तसेच नगर सिव्हिल हॉस्पिटलशी सुद्धा संगणमत करुन तुरुंगवासापासून दूर राहण्यासाठी आजाराचे कारण काढून गेल्या सात दिवसांपासून नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आराम करत आहे. तर त्याआधी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालय देखील दोन-चार दिवस आराम केलेला आहे. तुरुंगात राहण्याचे टाळून रुग्णालयात आराम करण्याचा हा आरोपीचा डाव आहे. त्यामुळे आरोपीला नेमके काय झाले आहे ? असा कोणता मोठा आजार झाला आहे ? याबाबत आम्हाला शंका आहे. तरी कृपया नगरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी अनिल जोंधळे, कैलास देशमुख, एस. टी. देशमुख, हेमंतराजे पवार, प्रकाश गुंजाळ, डॉ. विक्रमसिह ढोमसे, प्रभाकर राहणे ठेवीदार दूधगंगा पतसंस्था यांनी केली आहे.
