दुधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण !
मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये
वैद्यकिय अहवाला बाबत तहसीलदार तथा कारागृह अधिक्षकांचे मौन
जिल्हा शल्यचिकित्सकांचाही प्रतिसाद नाही सर्वकाही संशयास्पद
प्रतिनिधी —
दूधगंगा पतसंस्थेच्या सुमारे 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी तुरुंगात असलेला मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोदर कुटे याला अचानकपणे संगमनेरातील दुय्यम कारागृहातून ग्रामीण रुग्णालय संगमनेर आणि या रुग्णालयातून थेट नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. आरोपीला नगर येथे का दाखल करण्यात आले ? याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांसह संगमनेरचे दुय्यम कारागृह अधीक्षक तथा तहसीलदार यांनी मौन बाळगले असून जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) यांनी देखील संपर्क करूनही प्रतिसाद दिला नसल्याने आरोपीच्या आजाराबाबत, त्याला रुग्णालयात दाखल केल्या बाबत संशयास्पद स्थिती निर्माण झाली असून याबाबत ठेवीदार व आर्थिक घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या पिडीतांमध्ये उलट सुलट चर्चा, आरोप सुरू आहेत.

संगमनेरातील सहकार क्षेत्रात झालेला सर्वात मोठा अपहार आणि बड्या राजकीय पुढार्यांचा त्यात असलेला सहभाग म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या दूधगंगा नागरी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याला अनेक महिन्यांनंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर सदर आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. जामीन न मिळाल्याने आरोपी संगमनेरच्या कारागृहामध्ये होता. मात्र चार दिवसांपूर्वी सदर आरोपीला संगमनेर येथे ग्रामीण रुग्णालयात आजारपणाचे कारण दाखवून ॲडमिट करण्यात आले आणि त्यानंतर संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार आरोपीला थेट नगरच्या सिव्हिल रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संगमनेरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 18 तारखेला अहवाल (मेमो) दिल्यानंतर कारागृह अधीक्षक तथा तहसीलदारांनी देखील लगेच याच दिवशी आदेश काढून झटपट कार्यवाही केली आहे.

संगमनेरचे तहसीलदार तथा दुय्यम कारागृह अधीक्षक धीरज मांजरे यांच्याशी भ्रमणध्वनी व्हाट्सअप द्वारे संपर्क करून आरोपीला नगरला उपचारासाठी दाखल करण्यास जी कारणे देण्यात आली आली आहेत त्या वैद्यकीय कारणांचा डॉक्टरांनी दिलेला अहवाल (मेमो) याची प्रत मागितली असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याविषयी त्यांनी सोयीस्कर रित्या मौन बाळगले आहे. यासंदर्भात संगमनेरची प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना देखील कळविण्यात आले होते.

तसेच नगरचे जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) संजय घोगरे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून दोनदा संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तसेच व्हाट्सअप द्वारे देखील मेसेज केला असता त्यांनी या संदर्भात कुठलीही माहिती दिली नसून मौन बाळगले आहे. एकंदरीत सर्व बाबी पाहता या प्रकरणी एवढे मौन बाळगण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित झाला आहे. आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी, त्याला नेमका कोणता आजार झाला आहे आणि रुग्णालयात किती दिवस ठेवावे लागणार आहे याबाबत देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चुप्पी साधण्यात आलेली आहे.
शासकीय यंत्रणेवर राजकीय दबाव
मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा राजकारणातला बडी आसामी असून गुन्हा दाखल झाल्यानंतर तो अनेक दिवस फरार होता. आरोपीचे राजकीय संबंध पाहता आणि अद्यापही विविध पदांवर असणाऱ्या या आरोपीला छुप्या पद्धतीने राजकीय सपोर्ट मिळत आहे. याप्रकरणी राजकारणातल्या बड्या नेत्यांचा, सत्ताधाऱ्यांचा संगमनेरातील आणि जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणावर दबाव असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणाखाली आरोपीला आता पुन्हा पुणे येथील रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समजली आहे.
