पोलिसांच्या सततच्या छापेमारीमुळे ‘मोबाईल ॲप द्वारे’ ‘मटका सुरू !

प्रतिनिधी —

नगर एलसीबी आणि संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेरात सुरू असणाऱ्या चलता फिरता मटका आणि मोबाईल मटक्यावर सलग छापासत्र सुरु केल्यानंतर मटका चालवणाऱ्या किंग मंडळींनी आता धंदा करण्यासाठी पवित्रा बदलला असून मोबाईल ॲप द्वारे मटका सुरु असल्याची माहिती समजली आहे.

पोलीस आणि पथकांच्या हप्तेखोरीला कंटाळून मटका धंदा बंद करत असल्याची चर्चा संगमनेर शहरात घडवली जात असल्याने मटका चालकांनी धंदा बंद केल्याचे चित्र दिसत असले तरी त्यानंतर गेल्या आठ दिवसात सातत्याने छापेमारी करून पोलिसांनी सहा गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यांमध्ये थेट संगमनेरातले मटका किंग आरोपी झाल्याने आणि चलता फिरता, मोबाईल वरचा मटका व महत्त्वाचे आरोपी सापडल्याने मटका किंग मंडळींनी आपल्या धंद्याचा पवित्र बदलला असून आता ‘मोबाईल ॲप’ द्वारे मटका सुरू आहे.

संगमनेरातील मटक्याचा धंदा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलिसांनी उचल खाल्ली असून सातत्याने कारवाया सुरू आहेत. त्यामुळे विविध प्रकारे छुप्या पद्धतीने हा धंदा करणाऱ्यांवर सुद्धा पोलिसांचे लक्ष असून छापे टाकले जात आहेत. मोबाईल ॲप द्वारे धंदा केला जात असल्याची खबर पोलिसांना असून त्यादृष्टीने पोलिसांच्या गुप्त हालचाली सुरू असल्याचे देखील समजते. नगर जिल्ह्यात आघाडीवर असणाऱ्या आणि कोट्यावधी रुपयांची उलाढाल असणारा संगमनेरातला हा अवैध धंदा आता कधी कायमस्वरूपी बंद होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *