मटका किंग आणि पोलिसांची लपाछपी !

एकीकडे मटका बंद दाखवायचा….

दुसरीकडे चलता चलता मटका सुरु ठेवायचा आणि

तिसरीकडे पोलिसांचे छापे..

प्रतिनिधी —

पोलीस खात्यातील विविध पथकांची वसुली आणि हप्तेखोरिला वैतागून संगमनेरच्या दोन मटका किंगने धंदा बंद केला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यांचे पंटर आणि खबरे तशी चर्चा घडवून आणत आहेत. हप्ते देऊनही पोलिसांकडून आणि नगर ते संगमनेर व्हाया श्रीरामपूर पथकांकडून होणारा छळ याच्याही चविष्ट चर्चा सुरू आहेत. मात्र दुसरीकडे गुपचूप मोबाईलवर आणि चिठ्ठ्या देऊन चलता फिरता मटका सुरू ठेवल्याने एकाच आठवड्यात नगरच्या एलसीबी पथकासह संगमनेर शहर पोलिसांनी त्या दोन्ही मटका किंग वर छापे टाकले. इतर आरोपी सापडले मात्र मटका किंग पळून गेले आहेत. या आधी फक्त पंटरवर कारवाई व्हायची. आता मात्र या चारही कारवायात मटका किंग आरोपी केले आहेत. पोलीस आणि पथकांमध्ये झालेला हा बदल सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे.

पोलिसांनी आणि पथकांनी सध्या फक्त संगमनेरातील मटका धंद्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. इतर अवयव धंदे मात्र जोरात सुरू आहेत. राजकीय वरदहस्त घेऊन अवैध धंदे करण्याचा संगमनेरात बराच उद्योग सुरू असतो. असाच राजकीय वरदहस्त घेऊन मटका धंदा देखील शहरात चालू आहेत. शहरातील मटका बंद करण्यात आला असल्याचे सांगितले जात असले तरी नगरच्या एलसीबी पथकाने तीन बत्ती चौक, दिल्ली नाका परिसरात छापे टाकून दोन गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात मटका किंग इतर आरोपी करण्यात आले आहेत. तर संगमनेर शहर पोलिसांनी देखील त्यानंतर दोनच दिवसात त्याच ठिकाणी छापा टाकून पुन्हा गुन्हा दाखल केला आहे. मटका किंग मात्र पसार आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी छापा टाकून दुसऱ्या मटका किंगसह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

या गुन्ह्यात पोलिसांनी दोन्ही मटका किंग शंकर भागप्पा इटप आणि अश्रफअली समशेरअली सय्यद जहागीरदार यांना आरोपी केले असून ते पसार आहेत. तर शाफीन अल्ताफ सय्यद (वय 24) आणि जैश शौकत सय्यद (वय 27) अकबर बद्रुद्दीन मोमीन, आलिम बाबुलाल शेख हे एलसीबी टाकलेल्या छाप्यातील आरोपी आहेत. तर संगमनेर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात राज मोहम्मद सय्यद हा आरोपी असून  या तीनही छापांमध्ये आणि गुन्ह्यांमध्ये अश्रफ  जहाजिरदार याला आरोपी करण्यात आलेले आहे. खांडगाव रस्त्यावर टाकलेल्या छाप्यात शंकर इटप (संगमनेर) आणि विकास भाऊसाहेब मतकर (राहणार गुंजाळ मळा रोड, निमज, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापैकी तीन गुन्ह्यातील मटक्याचे ठिकाण एकच असून तीन बत्ती चौकातील दारूच्या दुकाना शेजारी हा उद्योग सुरू असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी कागदी चिठ्ठ्यांबरोबरच मोबाईल वरून शहरातील नागरिक मटका लावत असल्याचे आढळून आले. संगमनेर शहर पोलिसांनी पुणे नाशिक महामार्गावरील (बायपास) खांडगाव फाट्याजवळील पुलाखाली छापा टाकून चौथी कारवाई केली. पोलिसांनी मोबाईल देखील ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे मटका खेळणाऱ्यांची बरीच नावे आता पोलिसांनाही समजणार आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!