पोलिसांच्या कारवाईला नाही तर हप्तेखोरिला वैतागून संगमनेरातला ‘मटका’ धंदा बंद !

प्रतिनिधी —

सर्वसामान्य नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, संघटनांनी तक्रारी करूनही आणि वृत्तपत्रातून कितीही बातम्या आल्या तरी कधीही बंद न होणारा संगमनेरातला सर्वात मोठा ‘अवैध धंदा मटका’ हा कधीच बंद करण्यात आला नव्हता. मात्र काही महिन्यांपासून संगमनेरातले मटका किंग आणि पोलीस खात्यातील तथाकथित विविध पथकांमध्ये हप्ते घेण्या देण्यावरून आणि हप्त्यांच्या वाढणाऱ्या रकमांमुळे वादंग उठले आहे. त्यामुळे हा अवैध धंदा आता आम्हीच बंद करतो अशी भूमिका या मटका किंग मंडळींनी घेतली असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. कधी नव्हे तो पोलिसांच्या कारवाया ऐवजी त्यांच्या हप्ते खोरीच्या त्रासाला कंटाळून मटका किंग मंडळींनी आपला हा धंदा बंद केला आहे. आता हा अवैध धंदा खरंच कायमस्वरूपी बंद राहतो की पुन्हा पोलिसांच्याच मध्यस्थीने सुरू होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून नवीन मटका पेढी वाले संगमनेरात आपला संसार थाटण्याचा मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

सध्या शहरात मटका अड्डे आणि मटका धंद्याविषयी जोरदार उलट सुलट चर्चा सुरू असून यामध्ये विविध पोलीस पथकांकडून होणाऱ्या हप्तेखोरिचा त्रास वाढल्यामुळे हा अवैध धंदा बंद करण्यात आला असल्याची सर्वात मोठी चर्चा समोर आली आहे. नगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे केंद्र असणाऱ्या संगमनेर शहर आणि तालुक्यात मटका एक नंबरला होता. शहराच्या विविध भागात मटका अड्डे पोहोचले होते. ग्रामीण भागातील महत्त्वाच्या मोठ्या गावांमध्ये देखील मटका अड्ड्यांची रेलचेल होती. संगमनेर तालुक्यात चार पोलीस स्टेशन असल्याने या चारही पोलीस स्टेशनच्या कक्षेत येणाऱ्या महत्वपूर्ण गावांमध्ये मटका तेजीत होता. या धंद्या विषयी सर्वसामान्य जागरूक नागरिक, समाजसेवक, राजकीय, सामाजिक संघटना यांनी वेळोवेळी वरिष्ठांकडे तक्रारी देखील केल्या होत्या. मात्र सेटलमेंट मुळे हा धंदा कधीच पूर्णपणे बंद झाला नाही. असे आरोप नेहमीच होत आले आहेत. जिल्हाभर असणाऱ्या पोलीस पथकांच्या लुटूपुटूच्या कारवाया दाखवून हा धंदा कायमस्वरूपी चालूच ठेवण्यात आला होता. मात्र काही महिन्यांपासून जिल्हा पोलीस दलात असणारी विविध पथके आणि या पथकांमधील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वाढत्या मागण्यांमुळे आणि हप्त्यांच्या वाढत जाणाऱ्या रकमांमुळे वैतागून संगमनेरच्या मटका किंग मंडळीने हा धंदा बंद केला असल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांचे अत्यंत गाजलेले नावाजलेले नगरचे पथक, त्याचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, त्यांचे चालक तसेच श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे पथक, त्यातील पोलीस कर्मचारी तसेच संगमनेर उपविभागीय अधिकारी आणि त्यांचे पथक, शहर, तालुका पोलीस स्टेशन, घारगाव, आश्वी पोलीस स्टेशन अशा विविध पथकांकडून अवैध धंद्यांवर नेहमीच कारवाया होत होत्या. या पथकांकडून कारवाया होत असल्या तरी अवैध धंदे मात्र कायमस्वरूपी बंद होत नव्हते. संगमनेरात मटका अड्ड्यांबरोबरच, जुगारा अड्डे, गोवंश कत्तलखाने, गावठी दारू, ढाब्यांवर विकली जाणारी अवैध दारू आणि तिथले जुगार अड्डे, वाळू तस्करी तसेच गुटखा आणि गांजाचा मोठा व्यापार चालू असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. अमली पदार्थांची विक्री देखील संगमनेरात होत असते हे देखील उघड झाले आहे. असे असताना मटका मात्र नेहमीच तेजीत असायचा. पण आता मात्र ‘वादावादी’ मुळे हा धंदा बंद करण्यात आला असला तरी घरे काय आणि खोटे काय हे पोलिसांनाच माहीत. कारण चलता फिरता आणि मोबाईल वरचा मटका सध्या शहरात सुरूच आहे.

बंद तात्पुरता की कायमस्वरूपी ?

संगमनेरच्या मटका या अवैध धंद्याला मोठा इतिहास आहे. विविध मटका किंग राजकारणात देखील मोठमोठी पदे संगमनेरात या धंद्याच्या जोरावर मिळवून बसली होती. नगरपालिकेचे राजकारण यात आघाडीवर होते. शहराची गाडी हाकण्याचे काम देखील मटका किंग मंडळींनी केले आहे. मटका किंग मुळे शहरात जातीय तणाव आणि हाणामाऱ्या व दंगली घडल्याचे देखील आरोप झाले आहेत. तरीही मटका पूर्णपणे कधी बंद झाला नव्हता. सर्वसामान्य नागरिकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना हा धंदा कधीच बंद करता आला नाही. पोलिसांनीही तो केला नाही. मात्र आता पोलिसांचा आणि मटका वाल्यांच्या अंतर्गत मामला टोकाला गेल्यामुळे हा धंदा बंद झाला आहे. नेमका हा धंदा आता किती दिवस बंद राहतो तात्पुरता स्वरूपात हा धंदा बंद झाला आहे की कायमस्वरूपी ? की पुन्हा सुरू होणार आहे ? आता हे दिसूनच येईल.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!