संगमनेर मध्ये उत्पादित होणाऱ्या खाद्य तेलामध्ये भेसळ !

प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील खाद्यतेल बनवणाऱ्या काही उद्योजकांकडून या तेलामध्ये भेसळ करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करीत संबंधित भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील घुले यांनी तहसीलदार, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि जॉईंट कमिशनर यांच्याकडे केली आहे. तक्रार करून दोन महिने झाले असूनही कुठलीही कारवाई केली जात नाही म्हणून त्यांनी उपोषण करण्याचा इशाराही दिला होता मात्र तरीही कारवाई न झाल्याने आजपासून घुले यांनी संगमनेर येथील प्रांत अधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरू केले आहे या उपोषणास संगमनेर मधील शिवसैनिकांनी पाठिंबा दिला आहे.

संगमनेरात अनेक वर्षांपासून तेल उत्पादन करणाऱ्या श्याम ऑइल, भंडारी अग्रो, एस.व्ही.असावा ह्या तीनही तेल उत्पादक कंपन्यांचे तेल संगमनेरकर व आसपासच्या परिसरातील नागरिक हे नियमित खरेदी करत असतात. मात्र तेलात भेसळीचा संशय असल्याने सुनील घुले (घुलेवाडी, संगमनेर) त्यांनी वरील तिन्ही कंपन्यांचे शेंगदाणा, पामतेल, सूर्यफूल इत्यादी तेल विकत घेऊन पुणे येथील नामांकित लॅबवर परीक्षणासाठी पाठवले असता तिन्ही तेल उत्पादक कंपन्यांच्या तेलात भेसळ असल्याचा धक्कादायक निकाल त्या लॅबकडून आला असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले असून त्यासह अन्न व औषध प्रशासनाचे मापदंड न पाळता इतरही अनेक नियमांचे उल्लंघन हे तेल उद्योजक करीत असल्याचे म्हटले आहे.

मागील तीन महिन्यांपासून संगमनेर तहसीलदार, संगमनेर पोलीस खाते यासह अन्न व औषध प्रशासनाकडे घुले यांनी तक्रार दिली असून तेलात भेसळ होत असूनही आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अश्या व्यापाऱ्यांना अभय का मिळत आहे ? यांना कोण पाठीशी घालत आहे ? असे प्रश्न घुले यांनी उपस्थित केले आहेत. घुले यांनी जॉइंट कमिशनर अन्न व औषध प्रशासन, नाशिक यांना तक्रार अर्ज, पुरावे, रिपोर्ट आणि फोटो पाठवले असून मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांना प्रति सादर केल्या होत्या.

संगमनेर अकोले परिसरातील सर्व शेतकरी, लहान मोठे व्यापारी आणि सुजाण नागरिकांनी श्याम ऑइल, भंडारी ऑइल, असावा ऑइल येथून तेल खरेदी करताना त्याचा दर्जा स्वच्छता व शासनाने ठरवून दिलेल्या अटी जरूर तपासाव्या व सर्वसामन्य नागरिकांच्या आरोग्याला जपावे असे आवाहनही सामाजिक कार्यकर्ते सुनील घुले यांनी केले आहे.

या उपोषणाला शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, अमित चव्हाण, अमोल डुकरे, शाम नाईकवाडी, भाऊसाहेब हासे, इम्तियाज शेख, पंकज पडवळ, परवेझ शेख, फैसल सय्यद, इमरान सय्यद, अजीज मोमीन, राजू सातपुते, विजय सातपुते, अशोक बढे, देवीदास वराडे, गुलाब कोकाटे, भगवान पोपळघट आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

संगमनेरकर नागरिकांनी माझ्या पाठीशी खंबीर उभे राहावे. माझा स्वतःचा भेळीचा व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी संगमनेर तालुक्यात भेळ विक्री करून उदरनिर्वाह करत आहे. मला खटकलेल्या बाबी अनेक वेळा सदर तेल कंपन्यांच्या मालकांना सांगितल्या परंतु त्यांनी नेहमी दुर्लक्ष केले, प्लास्टिकचे डबे वारंवार वापरणे हा कायदेशीर गुन्हा आहे. शिवाय गेली अनेक वर्षांपासून सदर प्लास्टिकचे डबे, ड्रम हे स्वच्छ केलेले नाहीत. मिलच्या परिसरातील दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य तसेच स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करता तेच तेच डबे पुन्हा वापरणे, शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियमाचे अटीचे पालन न करणे अशा अनेक प्रकारच्या त्रुटी मला यात आढळल्या असल्याने मी संबंधित अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार केली. मात्र त्याची दखल घेतली नाही. कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आज पासून उपोषण सुरू केले आहे. सुनील घुले, संगमनेर (उपोषणकर्ते)

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!