संगमनेर कॉटेज हॉस्पिटलच्या कंपाउंड मधील आयुष्यमान आरोग्य मंदिर (केंद्र)ची मनमानी थांबवा !
अन्यथा मेडिकल ऑफिसरसह कर्मचाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा
आरोग्य सुविधा आणि उपचारात हलगर्जीपणाची अनेक उदाहरणे ; तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले निवेदन
प्रतिनिधी —
संगमनेर नगर परिषदेच्या कंपाउंड मध्ये असणाऱ्या कॉटेज हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये सुरू असलेले आयुष्यमान आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि डॉक्टर हे मनमानी करत असून उपचार करताना अनेक बालक, स्त्रिया, गरोदर माता भगिनी यांना त्रास झाला आहे. त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पाठवण्यात आले आहे. कामाला वेळेवर न येणे रुग्णालयात उपस्थित न राहणे असे उद्योग इथले कर्मचारी आणि डॉक्टर करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा सर्वांना काळे फासण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने माजी शहरप्रमुख अमरकतारी आणि येथील नागरिकांनी तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिला आहे.

शहरातील जुन्या कॉटेज हॉस्पिटलच्या कंपाउंड मध्ये आणि इमारतीत आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. हे केंद्र वादग्रस्त ठरत असून त्याविषयी अनेक तक्रारी निर्माण झाल्या असल्याने याकडे तालुका आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

हॉस्पिटल मधील या केंद्रातील कर्मचारी निष्क्रिय, बेजबाबदार असल्याची प्रचिती अनेक नागरिकांना आली आहे. या संदर्भाने तक्रार आणि तसे पुरावे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी असणारे मेडिकल ऑफिसर आणि इतर कर्मचाऱ्यांची बदली करून चांगला नवीन स्टाफ नेहवा अशीही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना संगमनेर शहर तसेच महिला आघाडी आणि नागरिक आंदोलन करतील आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांना आयुष्यमान आरोग्य केंद्रात काम करण्यास मज्जा करू असा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

आयुष्मान केंद्रांमध्ये करण्यात आलेले उपचार हे अतिशय हलगर्जी पद्धतीचे असून लहान बाळांना औषधांचे डोस चुकीच्या पद्धतीने दिल्याने त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागले. तेथे हजारो रुपये खर्च करावा लागला. मुलांना थंडी, ताप इन्फेक्शन वाढले. याला सर्वस्वी येथील यंत्रणा जबाबदार आहे. अशा कोणकोणत्या लहान मुलांना या हलगर्जीपणाला तोंड द्यावे लागले याची यादीच निवेदनामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊन कुटुंबाचे देखील आर्थिक शोषण झालेले आहे.

एका महिलेच्या गरोदरपणामध्ये पोटातील बाळाविषयी समस्या असताना देखील तेथील कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी हलगर्जीपणा करत बाळाच्या डोक्यात गाठ असल्याचे त्या महिलेला सांगितले नाही. त्यामुळे आठव्या महिन्यातच बाळ दगावले. याला संपूर्णपणे मेडिकल ऑफिसर आणि येथील कर्मचारी जबाबदार आहेत. गरोदर मातांना एक सोनोग्राफी ही मोफत असताना आणि ती नऊ महिन्यात केव्हाही करता येत असताना येथील यंत्रणा नऊ महिने झाल्याशिवाय मोफत सोनोग्राफी करत नाही अशीही तक्रार करण्यात आलेली आहे. तसेच कॉपर टी आणि कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशन संदर्भात देखील तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ज्या महिलांवर असे उपचार करून त्यांना पीडित करण्यात आलेले आहे त्यांची नावे देखील देण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे गरोदर महिलांना कॅल्शियम सारख्या औषधांचा पुरवठा न करणे, सोनोग्राफीसाठी चिठ्ठी लवकर न देणे, उद्धट बोलणे, जे उपचार आयुष्यमान केंद्राच्या स्तरावर आहेत ते न करता त्यांना खासगी दवाखान्यात जाण्यास भाग पाडणे, विनाकारण चकरा मारायला लावणे असा त्रास देणे या ठिकाणी सुरू आहे. तसेच केंद्राची ओपीडी सकाळी 10 ते 11 एवढा एकच तास सुरू असते. त्यानंतर ती बारा ते एक वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येते असाही आरोप या निवेदनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता आपण लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, युवा सेनेचे अमित चव्हाण, अक्षय बिल्लाडे, पप्पू कानकाटे, इम्तियाज शेख, फैजल सय्यद, अमोल डुकरे, अनुप म्हाळस, अक्षय गाडे, त्रिलोक कतारी, शितल हासे, संगीता गायकवाड, वैशाली वडतले, राजश्री वाकचौरे, प्रशांत खजुरे, प्रकाश चोथवे, वेणुगोपाल लाहोटी, दीपक वनम, दीपक साळुंखे, विजय सातपुते, राजू सातपुते, पंकज पडवळ, योगेश खेमनर, लखन सोन्नर, गुलाब कोकाटे, सचिन साळवे, संभव लोढा, जयदेव यादव, अनिल खुळे, ब्रह्मा खिडके, रंगनाथ फटांगरे, प्रवीण चव्हाण, सचिन पावबाके, निलेश गुंजाळ, अजीज मोमीन, नारायण पवार, सदाशिव हासे, प्रवीण कडलग, सुनील घुले आदी नावे व सह्या आहेत.
