दुरवस्था झालेल्या पालखी मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ दखल
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातून जाणारा आणि खराब झालेला श्री.संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्ग दुरुस्त करावा अशी मागणी संगमनेर रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तसेच पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली होती. याची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक हद्दीपासून ते काकडवाडी, तळेगाव-चिंचोली गुरव पर्यंत दुरवस्था झालेल्या पालखी रस्त्याची पाहणी केली व उपाययोजनासंदर्भात आढावा घेतला. पुढील चार दिवसात रस्त्याची डागडुजी करणार असल्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिली आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगरचे कार्यकारी अभियंता शेवाळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पंचायत समितीचे उपअभियंता संदेश सातपुते, सहाय्यक अभियंता सूरज नाझरकर, गणेश गुंजाळ, रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप, काकडवाडी ग्रामपंचायत उपसरपंच जनार्दन कासार, दिलीप शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य अशोक मुळे, सुनील कासार, ज्ञानदेव काळे, केशव शिरसाठ, बाळासाहेब शिरसाठ ग्रामसेविका गांडोळे, बस्तीराम मुळे, प्रकाश तूपसुंदर आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. लवकरच हा रस्ता दुरुस्त होणार असल्याने ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले.
